Exclusive - अशी असणार नाशिक मेट्रो... १४,५२० कोटी रुपयांचा आराखडा तयार... हे मार्ग असणार...

Share:
Main Image
Last updated: 11-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ ऑगस्ट - नाशिक शहराची भविष्यातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महामेट्रोने ५८ किलोमीटर लांबीच्या 'लाइट मेट्रो' (Light Metro) नेटवर्कचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव तयार केला आहे. शहराच्या सर्वसमावेशक गतिशीलता आराखड्यांतर्गत (Draft CMP) सुमारे १४,५२० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबवण्याचे नियोजन आहे.

पूर्वी प्रस्तावित असलेली 'निओ मेट्रो' (Neo Metro) योजना रद्द झाल्यानंतर महामेट्रोने शहराच्या वाहतूक गरजांचा नवा पाहणी अहवाल तयार करून हा सुधारित लाइट मेट्रोचा प्रस्ताव सादर केला आहे.

असा असेल मेट्रोचा मार्ग आणि टप्पे:

पहिला टप्पा (एकूण लांबी: ३५ किमी | खर्च: ₹८,७७० कोटी):

 * कॉरिडोर १ (गंगापूर गाव ते नाशिक रोड): २१.५ किमीचा हा मार्ग सर्वात आधी पूर्ण केला जाणार असून, यासाठी २०३१ चे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

 * कॉरिडोर २ (मुंबई नाका ते पाथर्डी फाटा): १३.५८ किमीचा हा मार्ग २०३६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Advertisement

 * पहिल्या टप्प्यात दोन्ही मार्गांवरून पीक अव्हर्समध्ये (गर्दीच्या वेळी) प्रति तास सुमारे ११,००० प्रवासी प्रवास करू शकतील.

दुसरा टप्पा (एकूण लांबी: २३ किमी | खर्च: ₹५,७५० कोटी):

 * कॉरिडोर ३ (अंबड ते नाशिक विमानतळ - ओझर): २३ किमीचा हा मार्ग थेट नाशिक विमानतळाला शहराशी जोडेल. हे काम २०४६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

'निओ मेट्रो'ऐवजी आता 'लाइट मेट्रो':

केंद्र सरकारने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात नाशिकसाठी २,०९२ कोटी रुपयांच्या 'निओ मेट्रो' प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र, जागतिक दर्जाच्या आधुनिक वाहतूक पर्यायांचा विचार करता पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) दिलेल्या सूचनेनुसार निओ मेट्रोचा प्रस्ताव मागे घेण्यात आला. त्यानंतर महामेट्रोने नव्याने सर्वेक्षण करून लाइट मेट्रोचा आराखडा तयार केला आहे.

पुढील प्रक्रिया:

महामेट्रोने हा मसुदा सर्व संबंधित भागधारकांशी (Stakeholders) चर्चेसाठी खुला केला असून, त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. मिळालेल्या अभिप्रायानुसार अंतिम आराखडा तयार करून सप्टेंबर महिन्यात मंजुरीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल.

Advertisement

Comments

No comments yet.