नाशिक जिल्ह्यामध्ये १५ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी...

Share:
Main Image
Last updated: 11-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ ऑगस्ट - राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत अनुदानित खतांचे वितरण अधिक पारदर्शक, सुलभ आणि शेतकरी-केंद्रीत करण्यासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल्स’ (FFS) ही नावीन्यपूर्ण डिजिटल प्रणाली १५ ऑगस्ट २०२६ पासून नाशिक जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून लागू केली जाणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांची खतांसाठी दुकानांसमोर लागणाऱ्या रांगेतून सुटका होणार असून, घरबसल्या मोबाईलद्वारे खतांचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी ही माहिती दिली.

कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमधील यशस्वी अंमलबजावणीनंतर आता नाशिक जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जात आहे. मोबाईलवरील ‘एफएफएस’ अॅप किंवा कृषी कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेतकरी खत बुक करू शकतील. बुकिंग केल्यानंतर पहिल्या (T+1) किंवा दुसऱ्या दिवशी (T+2) संबंधित विक्रेत्याकडून खत प्राप्त होईल (बुकिंगच्या दिवशी खरेदी करता येणार नाही).

असे करा आगाऊ बुकिंग (४ टप्पे):

ओळख पडताळणी: ओटीपी (OTP) किंवा ई-केवायसीद्वारे (e-KYC) पडताळणी करणे.

गरज नोंदविणे: पीक व आवश्यक खतांची निवड करणे.

विक्रेता निवड: जवळच्या उपलब्ध खत विक्रेत्याची निवड करणे.

Advertisement

खत खरेदी: प्राप्त झालेला क्यूआर (QR) कोड किंवा टोकन दाखवून निश्चित केलेल्या दिवशी खत खरेदी करणे.

‘एफएफएस’ प्रणालीचे प्रमुख फायदे:

टंचाई व काळाबाजाराला आळा: खतांची वेळेवर उपलब्धता होईल आणि गैरव्यवहारांना पूर्णपणे बंदी बसेल.

लिंकिंगपासून मुक्ती: खतांसोबत इतर अनावश्यक उत्पादने खरेदी करण्याची सक्ती आता सहन करावी लागणार नाही.

संतुलित खत वापर: मृदा आरोग्यानुसार शिफारस केलेल्या खतांच्या वापरामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन पिकांची उत्पादकता वाढेल.

स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य: स्थानिक शेतकरी बांधवांना प्राधान्यक्रमाने खत उपलब्ध करून दिले जाईल.

शेतकऱ्यांनी क्यूआर कोड स्कॅन करून अॅप डाउनलोड करावे किंवा कृषी सहाय्यक, तालुका व मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी करावी. जिल्ह्यातील सर्व खत विक्रेते व कंपन्यांनी या सूचनांचे काटेकोर पालन करून "योग्य शेतकरी - योग्य खत - योग्य प्रमाण - योग्य वेळी" हे ब्रीद साध्य करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.