मनोहर शिंदे, (नाशिक) १० ऑगस्ट - महानगरपालिका ते कॅनडा कॉर्नर या अत्यंत महत्त्वाच्या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होऊन अवघे ३ ते ४ महिने उलटत नाहीत, तोच स्मार्ट सिटीच्या नावाखाली हा नव्याने तयार केलेला रस्ता पुन्हा फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या नियोजनशून्य कामावर आणि नागरिकांच्या कररूपी पैशांच्या उधळपट्टीवर माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
CCTV चेंबरसाठी रस्ता मोडीत; अधिकारी गायब
वर्षभर काम चालल्यानंतर हा रस्ता नागरिकांसाठी नुकताच खुला करण्यात आला होता. मात्र, स्मार्ट सिटीच्या CCTV कॅमेऱ्यांच्या चेंबरचे काम करण्यासाठी हा काँक्रीटचा रस्ता पुन्हा फोडणे सुरू होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी महापालिका किंवा स्मार्ट सिटीचा एकही जबाबदार अभियंता उपस्थित नव्हता. तेथे काम करणारे मजूर धुळ्याहून आलेले होते, तर कंत्राटदार देवळाली येथे असल्याची माहिती समोर आली.
डॉ. हेमलता पाटील यांचे महापालिका प्रशासनाला रोखठोक प्रश्न:
नियोजन शून्य का? रस्ता काँक्रीट करण्यापूर्वीच CCTV च्या चेंबरचे नियोजन का करण्यात आले नाही?
करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी का? अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून तयार केलेला रस्ता पुन्हा फोडण्याची वेळ का आली?
जबाबदारी कोणाची? कामाच्या ठिकाणी महापालिका किंवा स्मार्ट सिटीचे अधिकारी अनुपस्थित का होते? या संपूर्ण अनागोंदीची जबाबदारी नेमकी कोणाची?
हा विकास की अपव्यय? आधी नागरिकांच्या पैशांतून रस्ते तयार करायचे, नंतर ते फोडायचे आणि पुन्हा दुरुस्तीवर खर्च करायचा, हा कसला विकास?
लेखी परवानगीशिवाय काम करू नये; आयुक्तांकडे मागणी
"विकासकामांना आमचा विरोध कधीच नाही; मात्र विकासाच्या नावाखाली चाललेल्या या नियोजनाअभावाला आणि जनतेच्या पैशांच्या अपव्ययाला आमचा तीव्र विरोध आहे," असे स्पष्ट करत डॉ. हेमलता पाटील यांनी या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच योग्य लेखी परवानगीशिवाय हे काम पुढे सुरू करू नये आणि फोडलेला रस्ता योग्य स्पेसिफिकेशननुसार तातडीने दुरुस्त करून घ्यावा, असा इशाराही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.