Exclusive - नाशिकच्या या उद्योगाला मिळाले तब्बल ११ हजार कोटींचे काम...

Share:
Main Image
Last updated: 10-Aug-2026

विशेष प्रतिनिधी, (नाशिक) १० ऑगस्ट - संरक्षण क्षेत्रातील भारताची विश्वासू कंपनी 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड'च्या (HAL) नाशिक येथील कारखान्यात 'सुखोई Su-30MKI' या अत्याधुनिक लढाऊ विमानांचे उत्पादन पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलासाठी (IAF) १२ नवीन सुखोई विमानांची निर्मिती केली जाणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पहिले विमान २०२७-२८ पर्यंत हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

अपघातात गमावलेल्या विमानांची होणार भरपाई

डिसेंबर २०२४ मध्ये भारतीय हवाई दल आणि एचएएल यांच्यात ११,००० कोटी रुपयांचा करार झाला होता. अपघातांमध्ये गमावलेल्या लढाऊ विमानांची भरपाई करण्यासाठी ही १२ नवीन सुखोई विमाने तयार केली जात आहेत. या संपूर्ण प्रकल्पाची निर्मिती २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Advertisement

५० टक्क्यांहून अधिक स्वदेशी तंत्रज्ञान

नव्याने तयार होणाऱ्या Su-30MKI विमानांचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात ५० टक्क्यांहून अधिक स्वदेशी तंत्रज्ञान आणि सुट्या भागांचा (Indigenous Content) वापर केला जाणार आहे. एचएएलच्या नाशिक विभागाने यापूर्वी रशियन परवान्याअंतर्गत हवाई दलाला तब्बल २२२ सुखोई विमाने तयार करून दिली आहेत.

६०,००० कोटी रुपयांचा अपग्रेडेशन प्रकल्पही नाशिकमध्ये?

केवळ नवीन निर्मितीच नाही, तर हवाई दलाच्या सध्याच्या सुखोई ताफ्याचे आधुनिकीकरण (Upgrade) करण्याचे कामही नाशिकच्या एचएएल प्लांटला मिळण्याची मोठी शक्यता आहे. सुमारे ६०,००० कोटी रुपयांच्या या अपग्रेडेशन प्रकल्पात DRDO च्या मदतीने विमानांमध्ये नवीन स्वदेशी रडार आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (EW) सिस्टीम बसवली जाईल, ज्यामुळे सुखोई विमानांची मारक क्षमता दुप्पट होणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.