नैताळे–देवगाव रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरणासाठी ₹२० कोटींच्या कामास मंजुरी... मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश

Share:
Main Image
Last updated: 10-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० ऑगस्ट - अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यांतर्गत नैताळे–देवगाव रस्ता प्रजिमा. १२६ कि.मी. १२/८०० ते २७/४०० या मार्गाच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाच्या सुमारे ₹२० कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.या कामामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वर येथून शिर्डीकडे जाणाऱ्या तसेच शिर्डीहून नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, सुकर आणि जवळचा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

नैताळे–देवगाव हा मार्ग नाशिक–छत्रपती संभाजीनगर मार्ग ते देवगाव फाटा - सावळीविहीर–शिर्डी राज्य मार्ग क्र. ७ या रस्त्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावरून गुजरात राज्यातील भाविकांच्या सापुतारा–वणी–पिंपळगाव (ब.)–निफाड–नैताळे–देवगाव फाटा–सावळीविहीर शिर्डी अशा अनेक पायी दिंड्या शिर्डीकडे जातात. 

Advertisement

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक–त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी यांना जोडणारा महत्त्वाचा पर्यायी मार्ग म्हणूनही या रस्त्याचा वापर होणार आहे.सध्या नाशिक–निफाड–येवला या मार्गावरील चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून भरवस फाटा ते सावळीविहीर (शिर्डी) या मार्गाचे ७ मीटर रुंदीचे काँक्रीटीकरणही सुरू आहे. त्यामुळे या संपूर्ण मार्गाची सुसंगत जोडणी होण्यासाठी नैताळे–देवगाव रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण अत्यावश्यक होते.सध्या या रस्त्याची रुंदी केवळ ३.७५ मीटर असल्याने वाहनांची सुरक्षित वाहतूक करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. गेल्या वर्षभरात या मार्गावर २२ अपघात झाल्याची नोंद असून, भाविकांची वाढती संख्या आणि वाहतुकीचा वाढलेला ताण लक्षात घेता या रस्त्याच्या सुधारणा करणे अत्यंत गरजेचे झाले होते.

याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी सिंहस्थ कुंभमेळा निधीतून या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याची सूचना करून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता या महत्त्वाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. या कामामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होण्याबरोबरच नाशिक, निफाड, येवला व शिर्डी परिसरातील नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.