नाशिक, (प्रतिनिधी) १० ऑगस्ट - शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून वेगवेगळ्या भागांत पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका महागड्या बुलेटसह शाईन आणि अॅक्टिव्हाचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ, पंचवटी आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बुलेट सोसायटीच्या पार्किंगमधून गायब
पहिली घटना म्हसरूळ परिसरात घडली. येथील 'देवकृपा अपार्टमेंट' (लीलावती हॉस्पिटलजवळ) येथे राहणारे प्रवीण सुरेश भोये यांनी आपली बुलेट (MH 41 BC 7622) रविवारी (दि. ९) रात्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने संधी साधत ही बुलेट पळवून नेली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार जाधव पुढील तपास करत आहेत.
हिरावाडीतून 'शाईन' तर अशोका हॉस्पिटल परिसरताून 'अॅक्टिव्हा' चोरीस
दुसरी घटना हिरावाडी रोडवर घडली. दिनेश श्याम शेलार (रा. गणेश पॅलेस) यांची शाईन मोटारसायकल (MH 15 HZ 0933) गेल्या ३० जुलैच्या रात्री इमारतीची पार्किंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून हवालदार सानप तपास करत आहेत.
तर तिसऱ्या घटनेत भूषण भास्कर पैठणकर (रा. इंदिरानगर) यांची अॅक्टिव्हा (MH 15 EM 3285) गुरुवारी (दि. ६) सायंकाळी अशोका हॉस्पिटल परिसरात पार्क केलेली असताना चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार डंबाळे तपास करत आहेत.