MBBS चे शिक्षण आणखी महागले... आता लागणार एवढे लाख...

Share:
Main Image
Last updated: 10-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १० ऑगस्ट - महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस (MBBS) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी चिंतेची बातमी आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाने (FRA) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील १९ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे नवीन शुल्क निश्चित केले असून, त्यात वाढ झाली आहे. आता वार्षिक एमबीबीएस शुल्क ७.५० लाख रुपयांपासून तब्बल १७.१३ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

या अचानक झालेल्या शुल्कवाढीमुळे नीट (NEET) उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. साडेपाच वर्षांच्या या अभ्यासक्रमासाठी शिक्षण शुल्काव्यतिरिक्त वसतिगृह, भोजन आणि पुस्तकांचा खर्च गृहीत धरल्यास एकूण बजेट अनेक लाखांनी वाढणार आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे शैक्षणिक बजेट कोलमडले असून, शैक्षणिक कर्जाच्या नियोजनावरही मोठा परिणाम झाला आहे.

प्रमुख महाविद्यालयांचे नवीन वार्षिक शुल्क:

Advertisement

सर्वात महागडी महाविद्यालये: पालघरचे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (₹१७.१३ लाख) हे राज्यातील सर्वात महागडे ठरले आहे, तर नागपूरचे एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (₹१५.६२ लाख) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्वात कमी शुल्क असलेली महाविद्यालये: पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (₹७.५० लाख) आणि सिंधुदुर्गातील एसएसपीएम मेडिकल कॉलेज (₹७.६४ लाख) येथे सर्वात कमी शुल्क आहे.

इतर प्रमुख महाविद्यालये: नाशिकचे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज (₹१३.१६ लाख), एमआयएमईआर तळेगाव (₹११.०६ लाख), के. जे. सोमैया मुंबई (₹९.७० लाख), तेरणा नवी मुंबई (₹९.१३ लाख), डॉ. राजेंद्र गोडे अमरावती (₹८.९३ लाख) आणि परभणी मेडिकल कॉलेज (₹८.७८ लाख).

काहींचे शुल्क कमी किंवा स्थिर: नाशिकच्या एसएमबीटी इन्स्टिट्यूटने शुल्क १३ लाखांवरून १२.२७ लाखांपर्यंत कमी केले आहे. तसेच एसीपीएम धुळे, एमआयएमएस लातूर आणि विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर यांसह ७ महाविद्यालयांनी शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही.

Advertisement

Comments

No comments yet.