नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ९ ऑगस्ट - देशभरातील घरगुती एलपीजी गॅस (LPG) ग्राहकांसाठी केंद्र सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी, दुहेरी कनेक्शन्स रद्द करण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच सरकारी योजनांचा फायदा पोहोचवण्यासाठी आधार-आधारित ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी या प्रक्रियेसाठी १६ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या मुदतीपूर्वी ई-केवायसी न करणाऱ्या ग्राहकांची गॅस सबसिडी कायमची बंद केली जाणार आहे.
'या' ग्राहकांची सबसिडी होणार बंद:
ई-केवायसी अपूर्ण असलेले ग्राहक: ज्यांनी १६ ऑगस्टपर्यंत आधार पडताळणी केलेली नाही.
उच्च उत्पन्न गट: ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
अवैध/बनावट कनेक्शन्स: एकाच नावावर किंवा एकाच पत्त्यावर घेतलेली अतिरिक्त गॅस कनेक्शन्स थेट ब्लॉक केली जात आहेत.
मुदत चुकल्यास होणारे नुकसान:
१. गॅस सबसिडी बंद: बँक खात्यात थेट जमा होणारे अनुदान (Subsidy) पूर्णपणे थांबेल.
२. महागडा सिलिंडर: ग्राहकांना सवलतीच्या दराऐवजी व्यावसायिक किंवा विना-अनुदानित बाजारभावाने सिलिंडर खरेदी करावा लागेल.
३. बुकिंगमध्ये अडथळा: गॅस ऑनलाईन बुक करताना लॉगिन ब्लॉक होऊ शकते किंवा बुकिंग रद्द केले जाऊ शकते.
घरबसल्या मोबाईलवरून इ-केवायसी करण्याची सोपी पद्धत:
गॅस एजन्सीच्या रांगेत उभे न राहता ग्राहक आपल्या मोबाईलवरून ही प्रक्रिया सहज पूर्ण करू शकतात:
१. तुमच्या गॅस कंपनीचे (Indane, Bharat Gas किंवा HP Gas) अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा.
२. कनेक्शनशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरने ॲपमध्ये लॉगिन करा.
३. मेन्यूमध्ये जाऊन ‘e-KYC’ किंवा ‘Aadhaar Verification’ या पर्यायावर क्लिक करा.
४. मोबाईल कॅमेऱ्याच्या साह्याने तुमचा चेहरा (Face Authentication) स्कॅन करा.
५. आधारमधील माहिती जुळल्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होईल.