नाशिक जिल्ह्यात SIR चे काम किती टक्के झाले? या तालुक्यात सर्वाधिक काम...

Share:
Main Image
Last updated: 09-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ९ ऑगस्ट - मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत नाशिक जिल्ह्यात मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामाला मोठा वेग आला आहे. जिल्ह्यातील एकूणात ९०.२४ टक्के काम पूर्ण झाले असून, ५१ लाख ४ हजार ४५८ एकूण मतदारांपैकी तब्बल ४९ लाख ८२ हजार ५५७ मतदारांना EFs फॉर्मचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. फॉर्म वितरणाची ही प्रक्रिया ९७.६१ टक्के पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्ह्यात आत्तापर्यंत वितरण करण्यात आलेल्या फॉर्मपैकी ३९ लाख ४२ हजार ६५३ फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही वेगाने सुरू असून, मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

दिंडोरी, इगतपुरी आणि निफाड बाजी मारण्यात पुढे
विधानसभा मतदारसंघनिहाय कामगिरीचा विचार केल्यास दिंडोरी (ST) मतदारसंघात सर्वाधिक ९९.८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यापाठोपाठ इगतपुरी (९९.४१%), निफाड (९९.०४%) आणि नांदगाव (९८.१६%) यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.

Advertisement

इतर मतदारसंघांत बागलाण (९६.४५%), येवला (९६.०९%), कळवण (९६.०२%), नाशिक पूर्व (९५.११%), चांदवड (९३.५१%) आणि सिन्नर (९३.१८%) येथे काम ९० टक्क्यांहून अधिक झाले आहे. तर देवळाली (८७.८८%), मालेगाव मध्य (८५.६०%), मालेगाव बाह्य (८५.०४%), नाशिक मध्य (८३.२७%) आणि नाशिक पश्चिम (६१.५३%) या भागांत प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

४.९८ लाख नोंदी अद्याप प्रलंबित
जिल्ह्यातील ६ लाख ६३ हजार ३८६ नोंदी (१३ टक्के) 'Uncollectable' (मिळून न आलेले/अप्राप्त) म्हणून नोंदवल्या गेल्या आहेत. तर सध्या ४ लाख ९८ हजार ४१९ नोंदींचे काम प्रलंबित असून हे प्रमाण ९.७६ टक्के आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे: जिल्हाधिकारी
"एसआयआर प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा अचूक आणि पारदर्शक वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण ताकदीने कार्यरत आहे. आपली मतदार यादी दोषमुक्त व अद्ययावत करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मतदारांनी आपली योग्य माहिती व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देऊन बीएलओ (BLO) व प्रशासनाला सहकार्य करावे."
— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

Advertisement

Comments

No comments yet.