मनोहर शिंदे, (नाशिक) ९ ऑगस्ट - शनिवारी (८ ऑगस्ट) रात्री १० वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी, निफाड आणि नाशिक तालुक्यांतील विविध भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) अनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी नोंदवली गेली असून, त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५ किलोमीटर खोलीवर होता. मेरी (MERI) नाशिक केंद्राच्या नोंदीनुसार ही तीव्रता ४.१ Mg. इतकी होती. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कुठेही कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
?s=20
नागरिकांनी अजिबात घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असून संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.
संरचनात्मक सुरक्षिततेची पाहणी करण्याचे आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आपल्या घरांची व इमारतींची सुरक्षितता तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. इमारतींना किंवा भिंतींना कोणत्याही प्रकारचे तडे (क्रॅक्स) गेले आहेत का, याची पाहणी करावी. धोकादायक परिस्थिती आढळल्यास तात्काळ घर खाली करून स्थानिक प्रशासन, नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेशी संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
घाट आणि भूस्खलनप्रवण क्षेत्रांत विशेष दक्षता
विशेषतः घाट परिसर आणि भूस्खलनप्रवण (Landslide prone) भागातील नागरिकांनी जमिनीस तडे गेले आहेत का अथवा जमिनीखालून पाण्याचा प्रवाह किंवा आवाज येत आहे का, यावर लक्ष ठेवावे. असा काही संशय आल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होऊन प्रशासनाला कळवावे. कच्चे बांधकाम (दगड-मातीची घरे) असलेल्या नागरिकांनी अधिक दक्षता बाळगावी, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन:
अफवांवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडियावर (व्हॉट्सॲप, फेसबुक इ.) येणारे अनधिकृत मेसेज किंवा अफवा पुढे शेअर करू नका. केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.
संपर्क व मदत: आपत्कालीन किंवा आवश्यक प्रसंगी नागरिकांनी नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस पाटील, तलाठी किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.
?s=20