नाशिक रिंगरोड... येत्या १२ ऑगस्टपर्यंत...

Share:
Main Image
Last updated: 08-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) ८ ऑगस्ट - नाशिक परिक्रमा मार्ग (Nashik Ring Road) या महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे थेट खरेदीद्वारे भूसंपादन करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) मार्फत वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या आखणीत समाविष्ट असलेल्या गावांतील भूधारकांनी तातडीने आपली 'केवायसी' (KYC) प्रक्रिया पूर्ण करून थेट खरेदी नोंदणीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

या गावांचा आहे प्रकल्पात समावेश
नाशिक परिक्रमा मार्गाच्या आखणीत दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील २१ पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. यात:
दिंडोरी तालुका: वरवंडी
नाशिक तालुका: जलालपूर, महादेवपूर, गोवर्धन, आंबेबहुला, मुंगसरे, मातोरी, चांदशी, आडगाव, मुखमलाबाद, पाथर्डी, पिंपळगाव बहुला, पिंपळगाव खांब, देवळाली, वडनेर दुमाला, विहीतगाव, सारोळे, विंचूरगवळी, माडसांगवी, बेलगाव ढगा आणि पंचक.

Advertisement

सामाईक गटांसाठी संयुक्त खाते आवश्यक
प्रकल्पातील सामाईक गट क्रमांकाच्या (Joint Land Holdings) बाबतीत, नियमानुसार आवश्यकतेनुसार संयुक्त बँक खाते उघडून भूसंपादनाचा मोबदला थेट त्या संयुक्त खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित खातेदारांनी संयुक्त बँक खात्याची प्रक्रियाही वेळेत पूर्ण करून घ्यावी.

१२ ऑगस्टपर्यंतच संपर्क साधण्याची मुदत
थेट खरेदीद्वारे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि सविस्तर माहितीसाठी संबंधित भूधारकांनी १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत जुनी जिल्हा परिषद इमारत, दुसरा मजला, नाशिक येथील 'MSIDC' कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रारूप निवाड्यानंतर थेट खरेदी बंद होणार!
प्रत्येक गावाचा अंतिम 'प्रारूप निवाडा' (Draft Final Award) जाहीर होईपर्यंतच MSIDC कडून थेट खरेदीद्वारे भूसंपादन केले जाणार आहे. एकदा प्रारूप निवाडा जाहीर झाल्यावर थेट खरेदीची सवलत बंद होईल. त्यामुळे अधिकाधिक मोबदला आणि सुलभ प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी भूधारकांनी विहित मुदतीत KYC पूर्ण करून नोंदणी करावी, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.