मुंबई, (प्रतिनिधी) ८ ऑगस्ट - मुंबई महानगर प्रदेशाच्या (MMR) विस्तारासाठी आणि 'थर्ड मुंबई' (मुंबई ३.०) च्या नियोजित विकासासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सिंगापूरमधील जागतिक दर्जाच्या 'टेमासेक सुरबाना जुरोंग' आणि 'मॅपलट्री' या कंपन्यांसोबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) सामंजस्य करार केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
नीती आयोगाने वर्तवलेल्या अंदाजानुसार एमएमआर प्रदेशात १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आहे. अटल सेतू आणि नव्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या परिसराच्या विकासाला आधीच मोठी गती मिळाली आहे.
कराराची मुख्य वैशिष्ट्ये:
रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १.१ अब्ज डॉलरची FDI:
रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा 'मिश्र-वापर विकास प्रकल्प' (Mixed-use Development Project) उभारण्यासाठी 'मॅपलट्री'सोबत करार झाला आहे. यातून १.१ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा (अंदाजे ९,००० कोटींहून अधिक रुपये) अधिक परकीय थेट गुंतवणूक (FDI) महाराष्ट्रात येणे अपेक्षित आहे.
सुरबाना ज्युराँगकडे प्रकल्प व्यवस्थापन (PMC):
शहरी नियोजनाचा दांडगा अनुभव असणाऱ्या 'सुरबाना ज्युराँग' या सिंगापूरच्या संस्थेकडे रायगड-पेण ग्रोथ सेंटरच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारपदाची (Project Management Consultant) जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई ३.० साठी ३२४ चौ.कि.मी.चा मास्टर प्लॅन:
'थर्ड मुंबई'च्या एकात्मिक विकासासाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. यामध्ये वाहतूक, गृहनिर्माण, औद्योगिक क्षेत्रे आणि आधुनिक नागरी पायाभूत सुविधांचे टप्प्याटप्प्याने नियोजन केले जाईल.
महाराष्ट्रावरील जागतिक
गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला -
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतूमुळे रायगड परिसराचा कायापालट होत आहे. भविष्यात तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईचा उदय होणार असून, सिंगापूरसारख्या जागतिक भागीदारांच्या अनुभवामुळे महाराष्ट्रात आधुनिक तंत्रज्ञान, मोठी गुंतवणूक आणि रोजगाराच्या लाखो नव्या संधी निर्माण होतील."
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
?s=20