नाशिक, (प्रतिनिधी) ८ ऑगस्ट - जिल्ह्यातील सूक्ष्म भूकंपीय हालचालींवर आता अधिक प्रभावी आणि अचूक नजर ठेवली जाणार आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रा’ने (NCS) जिल्ह्यामध्ये सुरगाणा येथे अत्याधुनिक ‘ब्रॉडबँड सिस्मोग्राफ’ आधारित भूकंप मापन केंद्र यशस्वीरित्या कार्यान्वित केले आहे. या केंद्राद्वारे मिळणारी माहिती रिअल-टाईम स्वरूपात थेट नवी दिल्ली येथील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाला मिळणार आहे.
तीन ठिकाणी होणार उभारणी
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने तांत्रिक निकषांनुसार जिल्ह्यातील सुरगाणा, हरणबारी-वडे दिगर (ता. बागलाण) आणि मालेगाव या तीन ठिकाणी भूकंप मापन केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यात सुरगाणा तहसील कार्यालयात हे अत्याधुनिक उपकरण बसवण्यात आले आहे. या ब्रॉडबँड सिस्मोग्राफमुळे अगदी कमी तीव्रतेचे आणि सूक्ष्म भूकंपही वेळेत टिपणे, त्यांचे केंद्रस्थान अचूक शोधणे आणि वैज्ञानिक अभ्यासासाठी आवश्यक माहिती गोळा करणे शक्य होणार आहे.
विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी जनजागृती
या उपक्रमाचाच एक भाग म्हणून सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा येथील आश्रमशाळेत विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी भूकंपविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. NCS च्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी छोट्या नाटिकेद्वारे भूकंपाची निर्मिती कशी होते, याचे प्रात्यक्षिक दाखवले. भूकंपाच्या वेळी न घाबरता सुरक्षिततेचे नियम कसे पाळावेत, आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास NCS चे वरिष्ठ अधिकारी, कळवण-सुरगाणा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला मोठे बळ
"भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींचा अचूक अंदाज वर्तवणे शक्य नसले, तरी आधुनिक तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण जनजागृतीच्या बळावर होणारी हानी निश्चितच कमी करता येते. सुरगाण्यातील हे केंद्र जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला मोठे बळ देईल. नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आपत्तीच्या वेळी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहावे."
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी