दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण करत लूट... त्र्यंबकरोडवरील ITI भागातील प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 07-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट - शहरातील त्र्यंबकरोडवरील आयटीआय (ITI) भागात एका २४ वर्षीय तरुणाची वाट अडवून दोघा अज्ञात भामट्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत खिशातील १७ हजार रुपयांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुजीब साजिद शेख (वय २४, रा. गरीब नवाज कॉलनी, वडाळागाव) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो बुधवारी (दि. ५) काही कामानिमित्त सातपूर भागात गेला होता. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तो आपल्या दुचाकीवरून घरी परतत असताना, त्र्यंबकरोडवरील ITI जवळ दोन संशयित तरुणांनी त्याची वाट अडवली.

Advertisement

कुठलेही कारण नसताना संशयितांनी मुजीबला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या गोंधळाचा फायदा घेत भामट्यांनी त्याच्या खिशातील १७ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली व अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पोबारा केला.

या घटनेनंतर पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. सातपूर पोलिसांनी संशयितांविरोधात लुटमारीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब दहिफळे करत आहेत. रात्रीच्या वेळी शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.