नाशिक, (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट - शहरात महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला असून, वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींसह चार जणींचा विनयभंग झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार परिचीतांकडूनच घडले आहेत. याप्रकरणी म्हसरूळ, सातपूर, अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि 'पोक्सो' (POCSO) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारमध्ये फिरवून अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड
शिक्षणासाठी शहरात आलेल्या आणि म्हसरूळ परिसरातील हॉस्टेलवर राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी संशयित जीवन वाघ, दिगंबर ठाकरे, बाबाजी खैरणार, लोकेश व अन्य दोघांनी मैत्री केली. १८ जुलै रोजी संशयितांनी तिला धमकावून चारचाकीत बसवले आणि परिसरात फिरवत जीवन वाघ याने तिचा विनयभंग केला, तर दुसऱ्या एकाने याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. मुलीने विरोध केला असता गाडी थांबवून बळजबरी करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल असून उपनिरीक्षक मयुरी तुरे तपास करत आहेत.
शाळकरी मुलीचा पाठलाग करत धमकी
सातपूर येथील महालक्ष्मी चौकात सोमवारी (दि. ३) सायंकाळी दुकानात जाणाऱ्या शाळकरी मुलीचा संशयित विक्की शांताराम रोकडे (२५, रा. घोटी) याने विनयभंग केला. गेल्या दोन महिन्यांपासून पाठलाग करणाऱ्या विक्कीने "माझ्याशी बोलली नाहीस तर उचलून नेईन," अशी धमकी दिली. मुलीच्या वडिलांनी संपर्क साधला असता त्याने फोनवर शिवीगाळ केली. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक निरीक्षक भडांगे तपास करत आहेत.
घरात घुसून लग्नाची मागणी आणि धमकी
सिडकोतील पवननगर भागात राहणाऱ्या तरूणीच्या घरात कुणी नसल्याची संधी साधत परिचित साहिल जाधव (रा. सिन्नर) याने गुरूवारी (दि. ६) बेकायदा प्रवेश करून लग्नाची मागणी घालत विनयभंग केला. लग्न न केल्यास जीवाने मारण्याची धमकी दिल्याने अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास अंमलदार आव्हाड करत आहेत.
मुंबईच्या संशयिताकडून विवाहितेचा छळ
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित मझाहिर इरफान रंगवाला (३९, रा. भायखळा, मुंबई) याने पीडितेच्या घरात घुसून विनयभंग केला. गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून तो पीडितेचा पाठलाग करून, जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ करत होता. कुटुंबीयांनाही शिवीगाळ केल्याने इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक सपना पुरी तपास करत आहेत.