कुंभमेळ्यानिमित्त हजारो महिलांना रोजगार... बचत गटांना...

Share:
Main Image
Last updated: 07-Aug-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) ७ ऑगस्ट - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर स्थानिक महिला बचतगटांना व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि 'दे आसरा फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनेक’ (Accelerating Nano Enterprises through Kumbh) उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत महिला बचतगटांसाठी पहिले क्षमता-विकास प्रशिक्षण सत्र ४ ऑगस्ट रोजी पार पडले.

सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे २७ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या प्रचंड आर्थिक संधींमध्ये स्थानिक महिला उद्योजकांचा सहभाग वाढवणे आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

Advertisement

प्रशिक्षण सत्रातील मुख्य मार्गदर्शक व विषय:
व्यावसायिक संधी व पूर्वतयारी: उमेदचे स्वप्नील शिर्के यांनी महिला बचतगटांनी सिंहस्थासाठी आतापासूनच नियोजनबद्ध तयारी करण्याचे आवाहन केले. तसेच अनुप खंडेलवाल यांनी आगामी काळातील नव्या व्यवसाय संधींवर प्रकाश टाकला.

'अनेक' उपक्रमाची रूपरेषा: दे आसरा फाउंडेशनच्या वैशाली अपराजित यांनी पुढील दोन वर्षांत महिला उद्योजकांना दिले जाणारे प्रशिक्षण, मार्गदर्शन व सहाय्याची माहिती दिली.
डिजिटल मार्केटिंग: सेतू ॲडचे अनुपम कुलकर्णी यांनी व्यवसाय वृद्धीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक दिले.
आर्थिक साक्षरता व बँक योजना: कॉसमॉस बँकेच्या अधिकारी केतकी विसपुते यांनी बँकेच्या विविध कर्ज योजना आणि आर्थिक सेवांची माहिती दिली.

आगामी काळातील नियोजन:
‘अनेक’ उपक्रमांतर्गत येत्या काळात व्यवसाय नियोजन, डिजिटल मार्केटिंग, आर्थिक व्यवस्थापन, व्यवसाय नोंदणी, ब्रँडिंग आणि थेट बाजारपेठेशी जोडणी (Market Linkage) या विषयांवर विशेष सत्रे घेतली जाणार आहेत. यामुळे महिला बचतगट आणि पथविक्रेते कुंभमेळ्यातील संधींचा पूर्ण लाभ घेऊ शकतील.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुंभेथॉनचे ऋषभ वोरा, यश मोरे तसेच उमेदचे बंडु कासार, सिसोदिया आणि विजया शिरसाठ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement

Comments

No comments yet.