नाशिक, (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या औपचारिक प्रारंभाचे प्रतीक असलेला ध्वजारोहण सोहळा ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडणार आहे. नाशिक येथील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे होणाऱ्या या मुख्य सोहळ्यापूर्वी सर्व पायाभूत सुविधांची कामे मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा, असे कडक निर्देश कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर कुंभमेळा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक पार पडली. या बैठकीस नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, कुंभमेळा प्राधिकरण अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे यांच्यासह 'एमएसआयडीसी', जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, राज्य पुरातत्त्व विभाग, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद आणि नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या पुरोहित संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रकल्पांच्या कामांचा सविस्तर आढावा
बैठकीत कुंभमेळा तयारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या खालील कामांच्या प्रगतीचा टप्पानिहाय आढावा घेण्यात आला:
रामकुंड परिसर: रामकाल पथ व रामकुंड परिसरातील रस्त्यांची विकासकामे.
त्र्यंबकेश्वर परिसर: कुशावर्त कुंडाचे संवर्धन, दर्शन पथाची उभारणी आणि पाणीपुरवठा योजना.
इतर पायाभूत कामे: ध्वजस्तंभाची निर्मिती तसेच गजानन महाराज संस्थान ते आंबेडकर चौक मार्गाचा विकास.
ध्वजारोहण सोहळ्यास देशभरातून साधू-संत, महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हा कुंभमेळ्याच्या तयारीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याने सोहळ्याच्या वेळी कोणतेही काम अपूर्ण राहता कामा नये, असे स्पष्ट करत विविध यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
?s=20