नाशिक महापालिकेत लाचखोरी... ६० हजाराची लाच घेताना हा जाळ्यात...

Share:
Main Image
Last updated: 07-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट - नाशिक महानगरपालिकेच्या नविन नाशिक (सिडको) विभागीय कार्यालयात घरपट्टी आणि नियमित गाळेभाडे आकारणी करून देण्याच्या मोबदल्यात ६० हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक मारुती भिमाजी डोंगरे (वय ५६, वर्ग-३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी रंगेहात पकडले. महापालिकेच्या कार्यालयातील या धडक कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  

गाळ्यांच्या मोजमापानंतर लाचेची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, ५१ वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या इमारतीच्या पार्किंगच्या जागेत ३ दुकानांचे (गाळे) बांधकाम केले होते. या बांधलेल्या गाळ्यांची महापालिकेकडे नियमित घरपट्टी व आकारणी व्हावी, यासाठी तक्रारदार सिडको विभागीय कार्यालयातील घरपट्टी व पाणी पुरवठा विभागात गेले होते. तेथे कार्यरत सहाय्यक अधीक्षक मारुती डोंगरे यांनी दुकानांची पाहणी करून मोजमाप केले.  

पाहणीनंतर गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम नियमित करून भाडे आकारणी करून देण्याच्या मोबदल्यात ७० हजार रुपये आणि मागील इमारतीची घरपट्टी आकारून दिल्याची बाकी असलेले १० हजार रुपये, अशी एकूण ८० हजार रुपयांची लाचेची मागणी डोंगरे याने केली होती. लाच दिल्याशिवाय काम होणार नसल्याने तक्रारदाराने याबाबत ४ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (नाशिक) कडे तक्रार दाखल केली.  

Advertisement

६० हजारांत तडजोड; मुख्य गेटवर रचला सापळा
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने ४ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान डोंगरे यांनी ८० हजार रुपयांवरून तडजोड करत ६० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.  

त्यानंतर गुरुवारी (६ ऑगस्ट) नाशिक महानगरपालिका सिडको विभागीय कार्यालयाच्या मुख्य गेटजवळ एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून ६० हजार रुपयांची रक्कम स्वीकारतानाच आधीच पाळतीवर असलेल्या एसीबीच्या पथकाने डोंगरे याला रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  

प्रकरणाचा धावता आढावा:
संशयित आरोपी: मारुती भिमाजी डोंगरे (वय ५६ वर्षे, सहाय्यक अधीक्षक, घरपट्टी व पाणी विभाग, सिडको विभागीय कार्यालय, नविन नाशिक)  
मागितलेली लाच: रु. ८०,०००/- (तडजोडीअंती रु. ६०,०००/- नक्की)  
कारवाईचे ठिकाण: मनपा सिडको विभागीय कार्यालय गेटजवळ, नाशिक  
संबंधित पोलीस ठाणे: अंबड पोलीस ठाणे, नाशिक  

मार्गदर्शन व पथक:
सदर कारवाई एसीबी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदिप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सूर्यावंशी तसेच पोलीस अंमलदार संदीप वणवे, योगेश साळवे व समीर शेख यांच्या पथकाने केली.  
एसीबीचे आवाहन: कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, शरणपूर रोड, नाशिक (दू. ०२५३-२५७८२३० / व्हॉट्सॲप ९५४५०३१०६४) येथे संपर्क साधावा.

Advertisement

Comments

No comments yet.