नाशिक, (प्रतिनिधी) ६ ऑगस्ट - शहरातील वर्दळीच्या मेनरोड भागात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून रोकड व सोन्या-चांदीचे दागिने, तर राजीवनगर परिसरात उघड्या घरातून सोन्याचे मंगळसूत्र लांबवल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणी अनुक्रमे सरकारवाडा आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना: सॉक्स खरेदी करताना पर्सवर डल्ला; १.३८ लाखांचा माल लांबवला
गंगापूर रोडवरील गुरुजी हॉस्पिटलच्या मागे राहणाऱ्या नेहा राजेश जकातदार या मंगळवारी (दि. ४) दागिने दुरुस्तीसाठी सराफ बाजारात आल्या होत्या. प्रकाश सुपारी चौकातील अनुराधा कॉस्मेटिक दुकानासमोर सॉक्स खरेदी करत असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञात भामट्याने त्यांच्या पर्समधून दागिने व रोकड हातोहात लांबवली.
या चोरीत ७ हजार २ रुपयांची रोकड, सोन्याची साखळी, अंगठी, कानातील जोड, वेल, बुगडी, मंगळसूत्रातील वाट्या, चांदीचे पैंजण आणि महत्त्वाचे कागदपत्र असा एकूण १ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून हवालदार गांगुर्डे तपास करत आहेत.
दुसरी घटना: उघड्या घरातून ३२ ग्रॅमचे मंगळसूत्र लंपास
दुसऱ्या घटनेत, राजीवनगर येथील वैभव कॉलनीतील 'श्री नीलकंठ अपार्टमेंट'मध्ये राहणाऱ्या सुनिता विठ्ठल कापडी यांच्या घरात चोरी झाली. त्यांनी आपले ३२ ग्रॅम वजनाचे आणि सुमारे १ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र बेडरूममधील पलंगाच्या गादीखाली ठेवले होते.
दरवाज्याची उघडी कडी पाहून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत हे मंगळसूत्र चोरून नेले. ३० जुलै रोजी हा प्रकार लक्षात आल्यानंतर कापडी यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार टिळेकर पुढील तपास करत आहेत.