मनोहर शिंदे, (नाशिक) ६ ऑगस्ट - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ आणि २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील तपोवन परिसरात उभारल्या जाणाऱ्या साधूग्राम प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला आता मोठा वेग आला आहे. देश-विदेशातून येणाऱ्या साधू-महंतांच्या निवासासाठी आरक्षित असलेल्या १९१.२१ एकर जमिनीचे अधिग्रहण जलद व पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष भूमिसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी चांदवड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांची 'विशेष भूसंपादन अधिकारी (नाशिक साधूग्राम)' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२,२६७ कोटींचा निधी: शासन निर्णयानुसार साधूग्राम प्रकल्पाच्या भूसंपादन आणि प्रशासकीय खर्चासाठी तब्बल रु. २,२६७ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
खासगी जमिनीचे अधिग्रहण: साधूग्राम क्षेत्रातील १९१.२१ एकर खासगी जमिनीचे सार्वजनिक प्रयोजनासाठी अधिग्रहण करण्याचे महत्त्वपूर्ण कामकाज नवनियुक्त विशेष भूमिसंपादन अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे.
मुदतीत काम पूर्ण करण्याचे आदेश: कुंभमेळ्याचे नियोजन वेळेत पूर्ण व्हावे यासाठी भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करून जमीन तातडीने ताब्यात घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात दिले आहेत.
कुंभमेळ्याच्या उत्कृष्ट आयोजनासाठी आणि साधू-संतांच्या वास्तव्यासाठी आवश्यक असलेली ही जमीन वेळेत उपलब्ध व्हावी, यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर सर्व हालचालींना गती देण्यात आली आहे.