आडगाव परिसरात अपघातांचे सत्र...  दोन दुचाकीस्वार ठार...

Share:
Main Image
Last updated: 06-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ६ ऑगस्ट - आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातांमध्ये ३३ वर्षीय युवकासह ५९ वर्षीय ज्येष्ठाचा दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती संभाजी रोड आणि मुंबई-आग्रा महामार्गावर हे अपघात घडले असून, पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना: भरधाव इकोच्या धडकेत तरुण ठार
छत्रपती संभाजी रोडवरील हॉटेल लक्ष्मी परिसरात भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार किसन शेटीबा झाकणे (वय ३३, रा. बेरड वस्ती, माडसांगवी, नाशिक) यांचा मृत्यू झाला. २९ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास झाकणे हे आपल्या दुचाकीने (एमएच २२ बीबी ०५०३) नाशिककडून माडसांगवीच्या दिशेने जात होते.
यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव इको वाहनाने (एमएच १५ एचवाय ३५०७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात झाकणे यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मारूती शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चारचाकी चालक विष्णू बाबुराव जाधव याच्याविरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार गांगुर्डे तपास करीत आहेत.

Advertisement

दुसरी घटना: महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ५९ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू
दुसऱ्या घटनेत, मुंबई-आग्रा महामार्गावरील सुखसागर हॉटेल भागात भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वरजीराम राजाराम सोनवणे (वय ५९, रा. धात्रक फाटा, नाशिक) या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सोनवणे हे मंगळवारी (दि. ४) रात्री ओझरकडून नाशिकच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. विवेक सोनवणे यांनी त्यांना तात्काळ आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले, मात्र बुधवारी (दि. ५) उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. रोहित लोणारे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांत नोंद करण्यात आली असून हवालदार पाटील पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.