कुंभमेळ्यात कचरा व्यवस्थापन कसे असेल? असे आहे नियोजन...

Share:
Main Image
Last updated: 06-Aug-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) ६ ऑगस्ट - नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ स्वच्छ, शाश्वत आणि भाविकाभिमुख पार पाडण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या तांत्रिक सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुविधांबाबत विविध तज्ज्ञ संस्थांच्या प्रतिनिधींनी महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या.

या बैठकीला प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, मुख्याधिकारी अमोल चौधरी, युनिसेफचे आनंद घोडके, वॉश इन्स्टिट्यूटचे राजेश पाई, आयआयटी मुंबईचे डॉ. प्रदीप कल्बार आणि जागतिक बँकेचे जे. व्ही. आर. मूर्ती उपस्थित होते.

समितीच्या प्रमुख शिफारशी व नियोजित उपाययोजना
पर्यावरणपूरक वाहतूक: कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या कामांसाठी डिझेल-पेट्रोल वाहनांऐवजी विद्युत (इलेक्ट्रिक) वाहनांचा वापर केला जाईल.

शौचालये व सांडपाणी व्यवस्थापन: घाट परिसरात पुरेशा प्रमाणात शौचालये व पावसाळ्यात अतिरिक्त मूत्रालये उभारणे, सोक पिट किंवा सांडपाणी वाहिनीद्वारे सांडपाण्याची विल्हेवाट लावणे आणि महिला-पुरुष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे.

महिला बचत गटांचा सहभाग: कचरा संकलन आणि कचरापेटी व्यवस्थापनात स्थानिक महिला बचत गटांना सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव.

Advertisement

पिण्याचे पाणी व सुविधा: कुंभमेळा क्षेत्राकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर दर ३ ते ५ किलोमीटर अंतरावर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केली जाईल.

मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन (MHM): महिला व मुलींसाठी विशेष मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन उपक्रम राबवण्यात येणार आहे.

प्रशिक्षण व गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड: स्वच्छता कर्मचारी आणि कंत्राटदारांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील. तसेच स्वच्छतेशी संबंधित 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' करण्यासाठी विविध संस्थांसोबत आतापासूनच तयारी सुरू करण्यात येईल.

या शिफारशींच्या आधारे विभागनिहाय कचरा व्यवस्थापन आराखडा, पाणी केंद्रांचे मॅपिंग आणि साधूग्राममधील स्वच्छतेसाठी 'युनिसेफ'सोबत समन्वय साधून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.