दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ६ ऑगस्ट - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणात बुधवारी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पार पडली. कुंभमेळ्यात येणाऱ्या हजारो भाविकांची वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बस वाहतूक आराखड्यावर या बैठकीत सविस्तर मंथन करण्यात आले.
या बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन विभाग, रेल्वे, पोलीस, नाशिक महापालिका आणि 'सिटीलिंक'चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
धार्मिक स्थळांशी थेट कनेक्टिव्हिटी: नाशिक-त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शनी शिंगणापूर, भीमाशंकर, सप्तशृंगी, घृष्णेश्वर आणि कवनई या प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या मार्गांवर विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले जाणार आहे.
विमान, रेल्वे व बस वाहतुकीचा समन्वय: नाशिक विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी बस वेळापत्रकाचे योग्य समन्वय साधले जाईल. मुख्य तीर्थक्षेत्रांसाठी थेट एसटी सेवा सुरू करण्याच्या व्यवहार्यतेवरही चर्चा झाली.
शटल बसमध्ये माहितीपट: बाह्य वाहनतळांवरून (आऊटर पार्किंग) शहरात येणाऱ्या शटल बसेसमध्ये भाविकांसाठी शॉर्ट व्हिडिओ दाखवले जातील. यात मार्गांची माहिती, हेल्पलाइन क्रमांक, धार्मिक स्थळांचा इतिहास आणि सुरक्षेच्या सूचना असतील.
पायाभूत सुविधा व टर्मिनल्स: प्रवाशांची मागणी (Origin-Destination), पार्किंग क्षेत्रे, पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ पॉइंट्स आणि बस टर्मिनल्सच्या व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीच्या शेवटी आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व विभागांना दिलेल्या प्रस्तावांवर काम करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या नियोजनाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी येत्या १५ दिवसांनंतर पुन्हा बैठक आयोजित केली जाणार आहे.