नाशिक, (प्रतिनिधी) ५ ऑगस्ट - सिंहस्थ कुंभमेळा-२०२७च्या पार्श्वभूमीवर बी.ओ.टी. (BOT) तत्त्वावर विकसित करण्यात येणाऱ्या आडगाव ट्रक टर्मिनलच्या पुनर्विकासाला नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने तत्त्वतः पाठिंबा दर्शविताना, "विकासाला आमचा विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांवर अन्याय होऊ देणार नाही," अशी ठाम भूमिका मांडली आहे. या संदर्भात असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अमित रंजन यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
असोसिएशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन गेल्या अनेक वर्षांपासून आडगाव ट्रक टर्मिनल आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या जागतिक स्तरावरील धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आधुनिक ट्रक टर्मिनल उभारणे ही काळाची गरज आहे. मात्र या विकास प्रक्रियेत विद्यमान गाळेधारकांचे हक्क अबाधित ठेवून त्यांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले की, आडगाव ट्रक टर्मिनलमधील अनेक गाळेधारकांनी महानगरपालिकेशी झालेल्या ३० वर्षांच्या करारानुसार येथे व्यवसाय उभारला आहे. त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असल्याने पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची सक्तीची कारवाई किंवा गाळे रिकामे करण्याची कार्यवाही होऊ नये, अशी ठाम मागणी करण्यात आली.
नवीन ट्रक टर्मिनल हे केवळ वाहनांच्या पार्किंगपुरते मर्यादित न राहता ते वाहतूक उद्योगाचे आधुनिक सेवा केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी भूमिका असोसिएशनने मांडली. यामध्ये ट्रक चालकांसाठी सुसज्ज विश्रांतीगृह, स्वच्छ स्नानगृह व स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, परवडणाऱ्या दरातील भोजन व्यवस्था, चालक प्रशिक्षण केंद्र, रस्ता सुरक्षा प्रशिक्षण, वाहन दुरुस्ती व स्पेअर पार्ट्सची सुविधा, इंधन केंद्र, सीसीटीव्ही सुरक्षा, अग्निशमन व्यवस्था, सौरऊर्जा, हरित परिसर, डिजिटल प्रवेश व्यवस्था, ई-टॉयलेट, वैद्यकीय प्रथमोपचार केंद्र आणि आरोग्य तपासणी केंद्र उभारण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली.
तसेच ट्रक टर्मिनलच्या नियोजन, अंमलबजावणी आणि व्यवस्थापन प्रक्रियेत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली. कारण वाहतूक उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव असलेल्या घटकांच्या सहभागामुळे भविष्यातील ट्रक टर्मिनल अधिक परिणामकारक आणि उपयुक्त ठरेल, असे असोसिएशनचे मत आहे.
यावेळी सहाय्यक आयुक्त अमित रंजन यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करत निवेदनातील मागण्यांचा नियमानुसार व सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच संघटनेच्या वतीने उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांना दिले.
या शिष्टमंडळात अध्यक्ष पी. एम. सैनी, चेअरमन राजेंद्र फड , सचिव बजरंग शर्मा, जयपाल शर्मा, सुनील बुराड, रामभाऊ सूर्यवंशी, जे. पी. इंदोरिया, संजय तोडी, सल्लागार एच. जी. तिवारी, महेंद्रसिंग राजपूत, रमेश शर्मा, सुभाष जांगडा, शंकर धनावडे, शुभम दुबे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.