नाशिक, (प्रतिनिधी) ४ ऑगस्ट - दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका २४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करत त्याच्या जवळील तीन हजार रुपयांची रोकड बळजबरीने लुटल्याची खळबळजनक घटना महामार्गावरील पारस वाईन भागात घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरुण विजय तिवारी (वय २३, रा. ज्ञानेश्वर नगर, पाथर्डी फाटा) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
अशी घडली घटना:
वरुण तिवारी सोमवारी (दि. ३) इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राकडे गेला होता. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास तो घरी जाण्यासाठी निघाला असता, त्याचे दोन मित्र तुषार जाधव व रोहित गोसावी हे त्याला सोडण्यासाठी महामार्गापर्यंत आले. पारस वाईन समोरील सर्व्हिस रोडवर तिघे मित्र बोलत उभे असताना, चार ते पाच अनोळखी तरुणांच्या टोळक्याने त्यांना अचानक गाठले.
या टोळक्यातील एकाने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत वरुणच्या खिशात हात घातला. वरुणने या प्रकारास तीव्र प्रतिकार केला असता, संशयितांपैकी एकाने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केला.
मित्र मदतीला धावले, टोळक्याने केला पोबारा
लोखंडी रॉडचा फटका बसताच वरुण रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. त्याच्यासोबत असलेले मित्र मदतीसाठी पुढे धावले असता, संशयितांनी जमिनीवर पडलेल्या वरुणच्या खिशातील ३ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली आणि अंधाराचा फायदा घेत तिथून पोबारा केला.
या घटनेमुळे महामार्ग आणि सर्व्हिस रोड परिसरातील रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुरी करत आहेत.