मनोहर शिंदे, (नाशिक) ४ ऑगस्ट - आगामी ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील पुरातन मंदिरांचे संवर्धन, जतन व परिसराच्या विकासकामांना गती देण्याचे निर्देश राज्याच्या मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिले. कामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता सर्व प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मुख्यालयात सोमवारी यासंदर्भात महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) चे वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रमुख विकास व संवर्धन कामांचा आढावा
बैठकीत नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील एएसआयअंतर्गत सुरू असलेल्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कामांच्या प्रगतीची सविस्तर पाहणी करण्यात आली:
नाशिक शहर परिसर: संगम तीर्थ, जुने कुशावर्त, नारोशंकर मंदिर, काशी विश्वेश्वर, गौतमेश्वर, मुकुंदेश्वर मंदिर व तलाव, प्रयाग तीर्थ, सुंदरनारायण मंदिर व घाट, इंद्रकुंड, बालाजी कोट भिंत, टाळकुटेश्वर व मोदकेश्वर मंदिरे.
त्र्यंबकेश्वर परिसर: कुशावर्त कुंड, बिल्वा तलाव व मंदिर, चाखोबा मंदिर, गौतम तलाव आणि अजगरेश्वर समाधी परिसर.
या सर्व ठिकाणी कामाच्या अंमलबजावणीतील अडथळे तातडीने दूर करून विविध विभागांनी आपापसात प्रभावी समन्वय ठेवावा, अशा सूचना डॉ. कुलकर्णी यांनी दिल्या.
जागतिक पातळीवर सिंहस्थाचा प्रचार अन् 'कलाग्राम'ची संकल्पना
सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांवर बैठकीत चर्चा झाली:
दावोस २०२७ च्या व्यासपीठावर प्रचार: आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रचार व प्रसार केला जाणार आहे.
‘हर घर कुंभ’ व अध्यात्मिक परिषदा: 'महाराष्ट्र स्पिरिच्युअल थॉट लीडरशिप' उपक्रम, अध्यात्मिक परिषदा आणि जागतिक दर्जाचे 'सिंहस्थ इंटरप्रिटेशन अँड एक्स्पिरियन्स सेंटर' उभारले जाईल.
युनेस्को दर्जासाठी प्रयत्न: नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील वारसा स्थळांना ‘युनेस्को’ (UNESCO) च्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे.
कलाग्राम व सांस्कृतिक कार्यक्रम: महाराष्ट्रातील हस्तकला, लोककला आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे 'कलाग्राम' उभारले जाईल. याशिवाय, नाशिकचे गोदावरी मंडप आणि त्र्यंबकेश्वरचे अहिल्या मंडप येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
?s=20