नाशिक, (प्रतिनिधी) ४ ऑगस्ट - महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) चे गॅस कनेक्शन बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी शहरातील दोन नागरिकांना तब्बल ५ लाख ७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईलमध्ये बनावट अॅप डाऊनलोड करायला लावून बँक खात्यातून पैसे लांबवल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रॉयल एक्स्लो, कोनार्क नगर (आडगाव शिवार) येथील रहिवासी प्रताप जयदेव कुवर यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अशी घडली फसवणूक:
पहिली घटना (रु. ४ लाख १३ हजार):
गेल्या १२ मे रोजी भामट्याने (मोबाईल क्र. ९३४७७८१९९१) प्रताप कुवर यांच्याशी व्हॉट्सअॅप आणि कॉलद्वारे संपर्क साधला. एमएनजीएल गॅस बिल अपडेट करण्याचा बहाणा करत त्याने एक लिंक पाठवून 'MNGL App' डाऊनलोड करण्यास सांगितले. कुवर यांनी अॅप डाऊनलोड करताच भामट्याने त्यांचा मोबाईल हॅक केला आणि त्यांच्या 'एसबीआय' (SBI) बँक खात्यातून ४ लाख १३ हजार रुपये इतर खात्यांत वर्ग केले.
दुसरी घटना (रु. ९४ हजार):
अथर्व अपार्टमेंट, कोनार्क नगर येथील रहिवासी अनंत पंढरीनाथ मोरे यांनाही अशाच प्रकारे जाळ्यात ओढण्यात आले. भामट्याने (मोबाईल क्र. ७००२६५५५८०) संपर्क साधून त्यांना 'MNGL APK Link' डाऊनलोड करायला लावली. त्यानंतर मोरे यांच्या बँक खात्यातून ९४ हजार रुपये परस्पर लांबवण्यात आले.
पोलीस तपास सुरू
एकाच परिसरातील दोन नागरिकांची मिळून एकूण ५ लाख ७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक राठोड करत आहेत.
नागरिकांना आवाहन:
अज्ञात क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये अथवा कोणतेही अनोळखी अॅप डाऊनलोड करू नये. तसेच गॅस कंपनी किंवा बँक कधीही फोनवरून अॅप डाऊनलोड करण्यास सांगत नाही, त्यामुळे अशा कॉलला बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.