पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री? भाजप सोडणार?

Share:
Main Image
Last updated: 04-Aug-2026

 

मुंबई, प्रतिनिधी, दि. ४ ऑगस्ट २०२६ - 

राज्य सरकारच्या मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी एका सार्वजनिक सभेत “आता निवृत्त व्हावंसं वाटतं” असे विधान केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

 मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा असतानाच, आता विरोधकांनी या संधीचा फायदा घेत पंकजा मुंडे यांना थेट ‘मुख्यमंत्रीपदाची’ खुली ऑफर दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनीही पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याचे खुले आवाहन केले आहे.

गोपीनाथ मुंडेंनंतर ओबीसी नेतृत्वाला डावलले: विजय वडेट्टीवार

माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला पद्धतशीरपणे डावलण्याचे काम सुरू आहे. पंकजा मुंडे यांना पक्षात न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाल्यानेच त्यांच्या तोंडून अशी विधाने येत आहेत. त्यांनी आता भाजपमधून बाहेर पडून स्वतंत्र नेतृत्व करावे. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून घेतली जाऊ शकते.”

पंकजा मुंडे भाजपची वाघीण, पण पक्षातच त्रास: संगीता तिवारी

दरम्यान, काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनीही या चर्चेत उडी घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Advertisement

गोपीनाथ मुंडे यांची मुलगी असलेल्या पंकजा मुंडे या भाजपची वाघीण आहेत. मात्र दुर्दैवाने त्यांना स्वतःच्याच पक्षात त्रास दिला जात आहे. भाजपच्या धोरणांमुळे बाहेरच्या महिला तर त्रस्त आहेतच, पण आता त्यांच्या पक्षातील महिला नेत्याही वैतागल्या आहेत. पंकजा मुंडेंनी निवृत्तीचा विचार करण्यापेक्षा काँग्रेसमध्ये यावे. त्या काँग्रेसमध्ये आल्यास पक्षाची ताकद वाढेल आणि त्या खरोखरच राज्याच्या मुख्यमंत्री होऊ शकतात. यासंदर्भात विजय वडेट्टीवार हे राहुल गांधींशी नक्कीच चर्चा करतील,” असा दावा तिवारी यांनी केला.

पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, निवृत्तीच्या विधानावर चर्चा रंगल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या वक्तव्यावर अधिक स्पष्टीकरण दिले आहे. सभेत बोलताना त्या म्हणाल्या,

मला कधीकधी निवृत्त व्हावंसं वाटतं, ही भावना खरी आहे.”

परंतु, सभेतील लोकांचा उत्साह आणि प्रेम पाहून मला पुन्हा काम करण्याची नवी ऊर्जा व प्रोत्साहन मिळते.”

मला जनतेच्या आणि राज्याच्या विकासासाठी पुढेही काम करत राहायचे आहे.”

नव्या समीकरणांची चर्चा गरम

पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या या थेट ऑफरवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या राजकीय घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा उघड झाली असून, महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात नवी समीकरणे पाहायला मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Advertisement

Comments

No comments yet.