सर्वसामान्यांना मोठा दिलासा... या औषधांच्या किरकोळ किमती निश्चित...

Share:
Main Image
Last updated: 04-Aug-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ४ ऑगस्ट - केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषध किंमत निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा देत हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि मानसिक आरोग्याशी संबंधित २३ नवीन औषधांच्या कमाल किरकोळ किमती (Retail Price) निश्चित केल्या आहेत. 'औषध किंमत नियंत्रण आदेश, २०१३' (DPCO-2013) अंतर्गत अधिकृत अधिसूचना जारी करून हा आदेश लागू करण्यात आला आहे. आता देशभरातील कोणतेही मेडिकल स्टोअर किंवा औषध उत्पादक कंपनी या ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने औषधांची विक्री करू शकणार नाही.

कंपन्यांना कठोर निर्देश व कायदेशीर कारवाईचा इशारा

NPPA ने सर्व औषध उत्पादकांना स्पष्ट बजावले आहे की, या २३ औषधांची विक्री निश्चित दरांपेक्षा जास्त किमतीत करता येणार नाही. निश्चित केलेल्या किमतींव्यतिरिक्त केवळ जीएसटी (GST) स्वतंत्रपणे आकारता येईल. पुढील १२ महिन्यांच्या आत या प्रकारातील नवीन औषध बाजारात आणल्यास त्याची किंमतही याच मर्यादेत ठेवावी लागेल आणि बाजारात औषध आणल्यानंतर एका महिन्याच्या आत कागदपत्रे NPPA च्या पोर्टलवर सादर करणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा ग्राहकांकडून जादा पैसे उकळणाऱ्या कंपन्यांवर DPCO-2013 आणि 'आवश्यक वस्तू अधिनियम, १९५५' अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच जादा वसूल केलेली रक्कम व्याजासह वसूल केली जाईल.

निश्चित करण्यात आलेल्या २३ प्रमुख औषधांचे दर आणि उपयोग:

हृदयविकार, उच्च रक्तदाब व कोलेस्टेरॉल:

हृदयविकार व कोलेस्टेरॉल नियंत्रणासाठीचे औषध: ₹६.३७ / कॅप्सूल

ॲटोरव्हास्टॅटिन + क्लोपिडोग्रेल + ॲस्पिरिन (20/75/75 mg): ₹८.८९ / कॅप्सूल (रक्ताच्या गाठी रोखणे व हृदयविकार)

टेल्मिसार्टन + मेटोप्रोलोल (25 mg): ₹१५.०१ / गोळी (उच्च रक्तदाब)

टेल्मिसार्टन + मेटोप्रोलोल (50 mg): ₹१८.५० / गोळी (उच्च रक्तदाब व हृदयविकार)

टेल्मिसार्टन + क्लोर्थालिडोन + मेटोप्रोलोल (25 mg): ₹११.६७ / गोळी (उच्च रक्तदाब)

टेल्मिसार्टन + क्लोर्थालिडोन + मेटोप्रोलोल (50 mg): ₹११.७७ / गोळी (नियंत्रणात न येणारा उच्च रक्तदाब)

नेबिवोलोल + टेल्मिसार्टन: ₹१३.७० / गोळी (उच्च रक्तदाब)

टाइप-२ मधुमेह (Diabetes):

सिटाग्लिप्टिन + ग्लायमेपिराइड + मेटफॉर्मिन (1000 mg + 1 mg): ₹१७.७३ / गोळी

सिटाग्लिप्टिन + ग्लायमेपिराइड + मेटफॉर्मिन (1000 mg + 2 mg): ₹१९.४६ / गोळी

डापाग्लिफ्लोजिन + पायोग्लिटाझोन + मेटफॉर्मिन SR: ₹१८.७७ / गोळी

मानसिक आरोग्य व मज्जासंस्था (Anxiety & Depression):

Advertisement

क्लोनाझेपाम + पॅरॉक्सेटीन (12.5 mg): ₹१७.५२ / गोळी (चिंता, नैराश्य व पॅनिक डिसऑर्डर)

क्लोनाझेपाम + पॅरॉक्सेटीन (25 mg): ₹२०.०६ / गोळी (तीव्र नैराश्य)

डेसव्हेनलाफॅक्सीन (50 mg) + क्लोनाझेपाम: ₹१७.४७ / गोळी

डेसव्हेनलाफॅक्सीन (100 mg) + क्लोनाझेपाम: ₹२५.८३ / गोळी

एस्सिटालोप्राम + क्लोनाझेपाम: ₹१०.७२ / गोळी

संसर्ग आणि पोटाचे विकार:

ऑफ्लॉक्सासिन + मेट्रोनिडाझोल सस्पेन्शन (50/100 mg): ₹०.८६ / ml (बालकांमधील संसर्ग)

ऑफ्लॉक्सासिन + मेट्रोनिडाझोल सस्पेन्शन (100/200 mg): ₹१.०९ / ml (जिवाणूजन्य व पोटातील संसर्ग)

क्लॅरिथ्रोमायसिन + पँटोप्राझोल + अमॉक्सिसिलिन कॉम्बी किट: ₹१२२.५६ / किट (पोटातील अल्सर व संसर्ग)

वेदनाशामक, ॲनिमिया व इतर:

पॅरासिटामॉल ओरल सस्पेन्शन: ₹०.६६ / ml (ताप व वेदना)

एटोरिकॉक्सिब + पॅरासिटामॉल: ₹१०.९० / गोळी (वेदना व सूज)

आयर्न + फॉलिक ॲसिड सिरप: ₹०.२८ / ml (लोहाची कमतरता)

फेरस ॲस्कॉर्बेट + फॉलिक ॲसिड: ₹१६.९२ / गोळी (रक्ताल्पता/ॲनिमिया)

मायो-इनोसिटॉल + डी-चायरो इनोसिटॉल + व्हिटॅमिन D3: ₹९.२९ / ग्रॅम (PCOS व महिलांचे आरोग्य)

रुग्णांचे महिनाभराचे बजेट सुसाट होण्यापासून वाचणार

मधुमेह, बीपी आणि हृदयविकारांसारख्या आजारांवर रुग्णांना दरमहा हजारो रुपयांची औषधे विकत घ्यावी लागतात. औषध कंपन्यांच्या मनमानी दरआकारणीवर या निर्णयामुळे वेसण बसणार असून सर्वसामान्यांना आवश्यक औषधे आता अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील.

Advertisement

Comments

No comments yet.