नाशिक, (प्रतिनिधी) ४ ऑगस्ट - लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांना न्याय प्रक्रियेदरम्यान संवेदनशील, प्रभावी व सातत्यपूर्ण सहकार्य करणाऱ्या सपोर्ट पर्सन्सच्या (Support Persons) बहुमूल्य कार्याची दखल घेत, नाशिकमध्ये ‘बेस्ट सपोर्ट पर्सन अवॉर्ड २०२५-२६’ वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सपोर्ट पर्सन्सना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात अशा प्रकारचा गौरव उपक्रम राबवणारा नाशिक हा पहिलाच जिल्हा ठरला आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि 'विपला फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल एन. रोकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाल न्याय मंडळाच्या प्रधान न्यायाधीश व्हि. डी. भराडे, जिल्हा व सत्र न्यायाधीश अमेटा, सतीष हिवाळे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सुनील दुसाणे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. मिलिंद बाबर, सदस्य गोपाळ शिंपी, ॲड. पल्लवी घुगे, ॲड. भगवान एलमामे, तसेच बाल न्याय मंडळाचे सदस्य गणेश कानवडे व शोभा पवार उपस्थित होते.
पुरस्कार विजेते सपोर्ट पर्सन्स:
बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. मिलिंद बाबर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात पुढील सपोर्ट पर्सन्सचा सन्मान करण्यात आला:
प्रथम क्रमांक: सोनाली शहाणे
द्वितीय क्रमांक: गीतांजली पवार
तृतीय क्रमांक: विजया शिंदे
याशिवाय जिल्ह्यातील सर्व कार्यरत सपोर्ट पर्सन्सच्या योगदानाचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
'पोक्सो' कायद्यांतर्गत सपोर्ट पर्सन्सची भूमिका मोलाची
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत पीडित बालकांना मानसिक आधार देत न्याय मिळवून देण्यात सपोर्ट पर्सन्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यांच्या संवेदनशील आणि समर्पित कार्यामुळे बालकांचा व त्यांच्या कुटुंबाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो. भविष्यातही या सेवाभावी कार्याला अधिक गती देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी गुजर यांनी केले, तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा येवले यांनी आभार मानले. या प्रसंगी बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.