नाशिक, (प्रतिनिधी) ३ ऑगस्ट - नाशिक शहरात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, चोरटे आणि भामट्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे. पांडवलेणी परिसरात एका युवकाचा ३५ हजार रुपयांचा आयफोन हिसकावल्याची घटना घडली, तर शहराच्या वेगवेगळ्या भागांतून महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे मंगळसूत्र ओरबाडण्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. याशिवाय तीन ठिकाणी दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पांडवलेणी परिसरात ३५ हजारांचा आयफोन लंपास
पायथ्याशी फोनवर बोलत जाणाऱ्या एका युवकाचा भामट्याने मोबाईल हिसकावून नेल्याची घटना पांडवलेणी परिसरात घडली. फलक नईम शेख (रा. वडाळागाव) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो २९ जुलै रोजी पांडवलेणी परिसरातील पाण्याच्या टाकीकडून फाळके स्मारकाकडे पायी जात असताना, वाटेत भेटलेल्या एका अज्ञात तरुणाने त्याच्या हातातील ३५ हजार रुपये किमतीचा आयफोन हिसकावून पळ काढला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार देवरे तपास करत आहेत.
दोन महिलांचे २ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने ओरबाडले
शहर परिसरात भामट्यांचा सुळसुळाट झाला असून, म्हसरूळ आणि उपनगर भागात चैन स्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या:
म्हसरूळ: दिंडोरी रोडवरील कलानगर येथील अंगणवाडी सेविका रत्नप्रभा नंदकुमार पालखेडकर ६ जुलै रोजी रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून पायी जात असताना, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅमची सोन्याची पोत हिसकावून नेली. भामट्यांच्या ओढण्यामुळे रत्नप्रभा रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे तपास करत आहेत.
उपनगर (जेलरोड): वैशाली शांताराम रूपवते (रा. रुक्मिणी नगर) या रविवारी (२ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास चैतन्य नगर येथील आरोग्य वर्धिनी केंद्रासमोरून भाजीपाला घेऊन पायी जात असताना, ॲक्टिव्हावरून आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची (सुमारे दीड लाख रुपये किमतीची) सोन्याची पोत ओरबाडून नेली. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक हरसिंग पावरा तपास करत आहेत.
पार्किंग व सार्वजनिक ठिकाणांवरून तीन दुचाकी चोरीला
शहर परिसरातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी लांबवल्या आहेत:
१. मुंबईनाका: भाभानगर येथील सचिन रमेश अभंग यांची पल्सर (MH 15 JQ 0628) ३१ जुलै रोजी रात्री राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरीला गेली.
२. गंगापूर: क्रिकेट कोच शिवम गोविंद स्वामी हे शनिवारी (१ ऑगस्ट) पारिजातनगर येथील एन.सी.ए. क्रिकेट ग्राउंडवर गेले असताना, पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर (MH 15 DV 1828) चोरट्यांनी पळवून नेली.
३. देवळाली कॅम्प: अस्लम अखिल शेख यांची मोटारसायकल (MH 15 JT 7518) रविवारी (२ ऑगस्ट) सकाळी शिवानंद पुरी भाजी सेंटर परिसरातून चोरट्यांनी लंपास केली.
शहरात वाढत्या चोरी व चैन स्नॅचिंगच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.