नाशिक, (प्रतिनिधी) ३ ऑगस्ट - शहरात आत्महत्येच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. रविवारी (२ ऑगस्ट) शहरातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या तीन तरुणांनी अज्ञात कारणांवरून गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या तिन्ही घटनांमधील आत्महत्येमागचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पंचवटी, देवळाली कॅम्प आणि सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पेठरोड भागात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पहिली घटना पेठरोड परिसरातील सुदर्शन कॉलनीत घडली. साजन विजयराव शिंदे (वय ३५, रा. सुखदेव अपार्टमेंट, सुदर्शन कॉलनी) या युवकाने रविवारी सकाळी अज्ञात कारणातून राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला. ही बाब लक्षात येताच योगेश बोरसे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस जमादार कुलकर्णी तपास करत आहेत.
संसरीगावात शेतात लिंबाच्या झाडाला लावला गळफास
दुसरी घटना संसरीगाव परिसरात घडली. अनिल दत्तू पवार (वय २३, रा. लोने मळा, पोल्ट्री फार्मजवळ) या तरूणाने रविवारी सकाळी घर परिसरातील अनिल गोडसे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला साडी बांधून गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच त्यांचा भाऊ राजू पवार यांनी त्यांना तातडीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली राठोड यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार होलगीर पुढील तपास करत आहेत.
कारखाना भागातील शिवाजीनगरात तिसरी घटना
तिसरी घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बननाका परिसरातील शिवाजीनगर भागात घडली. अक्षय बेचन यादव (वय २६, रा. साईकृपा अपार्टमेंट, पूजा पेट्रोल पंपामागे) या युवकाने राहत्या घरातील स्वयंपाकघरात पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. भाऊ अभिषेक यादव यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस जमादार अनिल आहेर तपास करत आहेत.