नाशिक मतदार यादी... या दिवशी होणार जाहीर वाचन... पण कुठे?

Share:
Main Image
Last updated: 03-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ ऑगस्ट - भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १२३-नाशिक पूर्व आणि १२४-नाशिक मध्य या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. घरभेटीदरम्यान उपलब्ध न झालेल्या अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार (ASDD) मतदारांच्या यादीचे वाचन व पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

‘नाशिक पूर्व’मध्ये २ लाखाहून अधिक प्रपत्रे संकलित

१२३-नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील एकूण ४ लाख ९६ हजार ४०९ मतदारांपैकी आतापर्यंत २ लाख ४ हजार ५६७ मतदारांची गणना प्रपत्रे संकलित करण्यात आली आहेत. घरभेटीत न आढळलेल्या मतदारांची ASDD यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीचे जाहीर वाचन ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड आणि पंचवटी विभागीय कार्यालयात लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी कुंदन हिरे यांनी दिली. या यादीबाबत काही आक्षेप किंवा नाव नोंदणी असल्यास बी.एल.ओ. (BLO) यांच्याशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

‘नाशिक मध्य’मध्ये ५२ टक्के डिजिटायझेशन पूर्ण

Advertisement

दुसरीकडे, १२४-नाशिक मध्य मतदारसंघातील कामही वेगाने सुरू असून आतापर्यंत ७७.१६ टक्के गणना अर्जांचे वाटप झाले आहे, तर ५२.०८ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अर्पिता ठुबे यांनी लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि राजकीय पक्षांच्या बीएलए (BLA) प्रतिनिधींशी संवाद साधला.

उर्वरित ४७.९२ टक्के अर्जांमधील गैरहजर व स्थलांतरित मतदारांचा प्रत्यक्ष शोध घेऊन अचूक माहिती संकलित करण्यासाठी नगरसेवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नगरसेवकांनीही या कामात पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.

८ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

८ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित बीएलओंकडे गणना अर्ज सादर न करणाऱ्या मतदारांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अद्ययावत मतदार यादीत समाविष्ट होणार नाहीत, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी मतदार यादी अधिक अचूक आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.