नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ३ ऑगस्ट - आगामी ३० ऑगस्ट २०२६ रोजी होणारी 'राष्ट्रीय पदव्युत्तर पात्रता-अर्थात-प्रवेश परीक्षा' (NEET-PG 2026) पूर्णपणे सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाने सक्षम वातावरणात पार पडावी यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी तयारीचा सविस्तर आढावा घेतला. ही परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि विद्यार्थी-केंद्रित व्हावी, यासाठी अनेक महत्त्वाच्या सुधारणा आणि सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळ (NBEMS), तंत्रज्ञान भागीदार आणि इतर संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत परीक्षेची कार्यपद्धती, उमेदवारांसाठीच्या सोयी-सुविधा आणि सुरक्षेच्या विविध स्तरांची सविस्तर पाहणी करण्यात आली.
अफवा अन् फसव्या दाव्यांना बळी पडू नका
परीक्षेच्या पारदर्शकतेबद्दल विद्यार्थ्यांना आश्वस्त करताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. "प्रश्नपत्रिका आधीच लीक झाली आहे किंवा ती उपलब्ध करून दिली जाईल," अशा फसव्या दाव्यांना आणि अफवांना उमेदवारांनी अजिबात बळी पडू नये, असे त्यांनी सांगितले.
मंत्र्यांनी स्पष्ट केले की, परीक्षेची अंतिम प्रश्नपत्रिका ही अत्यंत सुरक्षित, 'एनक्रिप्टेड' (Encrypted) आणि वेळेची मर्यादा असलेल्या डिजिटल प्रक्रियेद्वारे परीक्षेच्या काही काळ आधीच निवडली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत गोपनीयतेचे अनेक स्तर असतात. त्यामुळे प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याचा दावा पूर्णपणे खोटा असून तो केवळ विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी केला जातो. विद्यार्थ्यांनी केवळ 'NBEMS' आणि आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीवरच विश्वास ठेवावा.
सुरक्षेची तगडी भिंत : ६० हजारांहून अधिक अधिकारी तैनात
NEET-PG परीक्षा निष्पक्ष आणि गैरप्रकारमुक्त व्हावी यासाठी प्रशासनाने अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था उभारली आहे:
आधुनिक सुरक्षेचे टप्पे: सर्व परीक्षा केंद्रांना वेळेआधीच सील करून त्यांची तपासणी केली जाईल. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही (CCTV) नजर, बायोमेट्रिक हजेरी, उमेदवारांची कडक झाडाझडती (Frisking) आणि सिग्नल जॅमर्स तैनात केले जातील.
थेट देखरेख (Live Monitoring): केंद्रीय आणि प्रादेशिक कमांड सेंटरद्वारे परीक्षेवर थेट नजर ठेवली जाईल. तसेच स्वतंत्र निरीक्षकांद्वारे प्रत्यक्ष देखरेख केली जाणार आहे.
६० हजार अधिकारी: संपूर्ण देशात ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ६०,००0 हून अधिक परीक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हाय-टेक डिजिटल सुरक्षा प्रणाली
प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी अनेक स्तरांचे डिजिटल एन्क्रिप्शन वापरण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे ऑफलाइन तयार केली जाईल आणि परीक्षेची वेळ सुरू होताच 'नियंत्रित डिजिटल डिक्रिप्शन' द्वारे ती उपलब्ध करून दिली जाईल.
कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा गैरप्रकाराचा प्रयत्न आढळल्यास विद्यार्थ्यांनी तात्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहनही आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे.