नाशिक, (प्रतिनिधी) ३ ऑगस्ट - शहरभरात पडलेले खड्डे, कुंभमेळ्याच्या कामांमुळे अस्तव्यस्त झालेले रस्ते आणि खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांचे जात असलेले बळी यांमुळे नाशिककरांमध्ये प्रशासनासह सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ही बिकट परिस्थिती पाहता आणि जनतेतील असंतोष शांत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने 'डॅमेज कंट्रोल' करत 'टास्क फोर्स'ची स्थापना केली आहे. दुसरीकडे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी खड्ड्यांमुळे प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
आमदार, नगरसेवक अन् ३१ प्रभागांचे पदाधिकारी मैदानात
नाशिक शहरात निर्माण झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेची गंभीर दखल घेत भाजपने विशेष 'टास्क फोर्स' तयार केला आहे. या टास्क फोर्समध्ये स्थानिक आमदार, माजी नगरसेवक, मंडल अध्यक्ष आणि शहरातील ३१ प्रभागांमधील पक्षाचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. हे सर्व पदाधिकारी आपापल्या प्रभागातील खड्डे आणि रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने कामे करून घेणार आहेत.
नागरिकांसाठी व्हॉट्सॲप / मोबाईल हेल्पलाइन जारी
नागरिकांना थेट तक्रार नोंदवता यावी यासाठी भाजपने ९८२३१२६९०४ हा मोबाईल क्रमांक जारी केला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील खड्ड्यांबाबत या क्रमांकावर माहिती व सूचना द्याव्यात, त्यानुसार महापालिका आयुक्त व संबंधित विभागाकडून त्वरित कामे करून घेतली जातील, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
"अधिकारी-आयुक्तांवर कारवाईची शिफारस करणार!"
"टास्क फोर्सच्या सूचनांनंतरही जर महापालिका अधिकारी किंवा आयुक्तांनी खड्डे बुजवण्याच्या कामात हलगर्जीपणा दाखवला किंवा दखल घेतली नाही, तर त्यांची थेट तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस केली जाईल," असा थेट इशारा भाजप नेते सुनील केदार यांनी दिला आहे.
खड्ड्यांमुळे प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात प्राण गमावलेल्या दीपाली बेळे यांच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
यापूर्वी खड्ड्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांचीही मंत्री महाजन यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले होते आणि त्यांनाही ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. तसेच, शिवसेनेचे (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनीही कोतकर कुटुंबाला वैयक्तिक १ लाख रुपयांची मदत सुपूर्द केली आहे.