नाशिक, (प्रतिनिधी) ३ ऑगस्ट - औषध उत्पादक कंपन्यांना जाळ्यात ओढून, भाड्याचे कार्यालय स्वतःचे असल्याचे भासवत तसेच बनावट प्रमाणपत्रे दाखवून १ कोटी ७३ लाख ७० हजार ३४३ रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी अहमदाबाद आणि झारखंड येथील कंपन्यांच्या सेल्स मॅनेजरच्या तक्रारीवरून नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी केली फसवणूक
अहमदाबाद येथील 'प्लाझा इंडस्ट्रीज प्रा. लि.' आणि झारखंड येथील 'जीएनपाल स्पेशालिटी मॉलिक्युल्स एलएलपी' या कंपन्यांचे सेल्स मॅनेजर विनय कुमार ओमप्रकाश (वय ६२, रा. नैनिताल, उत्तराखंड) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार:
१. खोट्या माहितीचा आधार: नाशिकमधील अशोक स्तंभ येथील 'डॉक्टर हाऊस' इमारतीत तळमजल्यावर असलेल्या कार्यालय क्र. ३ ही भाड्याची जागा स्वतःच्या मालकीची असल्याचे आरोपींनी भासपावले.
२. बनावट प्रमाणपत्रे: 'न्यूयान लाईफसायन्स' कंपनीच्या नावाने ड्रग्स लायसन्सधारक असलेल्या आरोपींनी त्यांच्या फर्मला ISO सर्टिफिकेट मिळाल्याचे बनावट ईमेल पाठवले आणि वेबसाईटवर प्रदर्शित केले. तसेच जर्मनी व नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेतल्याचा खोटा दावा करून कंपन्यांचा विश्वास संपादन केला.
३. मोठ्या ऑर्डर्स अन् बाऊन्स चेक: विश्वास संपादन केल्यानंतर १४ एप्रिल २०२५ पासून आरोपींनी 'Pregabalin', 'Telmisartan', 'Levosulpride' आणि 'Etoricoxib' या औषधांच्या मोठ्या ऑर्डर्स दिल्या. या मालाच्या मोबदल्यात आरोपींनी पुढील ३ महिन्यांच्या तारखेचे धनादेश (Cheques) दिले.
४. पळ काढला: दिलेले धनादेश बँकेत जमा करण्याची तारीख जवळ येण्यापूर्वीच आरोपींनी अतिरिक्त ऑर्डर्स देऊन पुन्हा पुढच्या तारखेचे चेक दिले आणि अचानक अशोक स्तंभातील कार्यालय बंद करून पोबारा केला.
बँकेत चेक वटलेच नाहीत. यामुळे 'प्लाझा इंडस्ट्रीज' कंपनीचे ७७ लाख ५९ हजार ११६ रुपये आणि 'जीएनपाल' कंपनीचे ९६ लाख ११ हजार २२७ रुपये असा एकूण १ कोटी ७३ लाख ७० हजार ३४३ रुपयांच्या मालाचा अपहार करून फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.
या आरोपींवर गुन्हा दाखल:
१. तुषार (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही)
२. अथर्व भिकू वाघमारे (रा. कोपरखैरणे, नवी मुंबई)
३. सचिन भिकू मोरे (रा. नवघर, जि. ठाणे)
पोलीस कारवाई:
हा संपूर्ण प्रकार एप्रिल २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडला असून, या प्रकरणी २ ऑगस्ट २०२६ रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१६(२), ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४०(२), आणि ६१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक तलवारे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.