दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २ ऑगस्ट - राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांना तात्काळ, सुलभ आणि थेट घरपोच पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या '१९६२ हेल्पलाइन' व 'व्हॉट्सॲप चॅटबॉट' सेवेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. एकट्या जुलै २०२६ या महिन्यात ३५ हजार ६८ पशुपालकांनी या आधुनिक सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी दिली.
BFIL व इंडसइंड बँकेच्या सहकार्याने उपक्रम
पशुसंवर्धन विभागाने भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड (BFIL) व इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ही हायटेक सेवा कार्यान्वित केली आहे. या माध्यमातून पशुपालकांना घरबसल्या पशुवैद्यकीय तज्ज्ञांशी थेट संपर्क साधून त्यांच्या जनावरांवर उपचार आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणे सोपे झाले आहे.
जुलै महिन्यातील सेवेचा ताळेबंद:
मोबाईल व्हेटर्नरी क्लिनिक: जुलै महिन्यात प्राप्त कॉलपैकी ३१ हजार ७५५ पशुपालकांना थेट 'मोबाईल व्हेटर्नरी क्लिनिक'द्वारे घरपोच प्रत्यक्ष सेवा देण्यात आली.
टेलिकन्सल्टेशन व व्हिडिओ कॉल: व्हॉट्सॲप चॅटबॉटवर संपर्क साधलेल्या ५९९ पशुपालकांपैकी १४५ जणांना व्हिडिओ कॉलद्वारे, तर ४५४ जणांना ऑडिओ कॉलद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन पुरवण्यात आले.
९०६३१४२२९९ क्रमांकावर 'Hi' पाठवून मिळवा सेवा
या सुविधेमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचत असून आपत्कालीन परिस्थितीत जनावरांवर तात्काळ उपचार होण्यास मदत होत आहे.
सेवा कशी मिळवाल?
पशुपालकांनी मोबाईलवर ९०६३१४२२९९ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे "Hi" असा मेसेज पाठवून किंवा क्यूआर (QR) कोड स्कॅन करून या चॅटबॉट सेवेचा लाभ घ्यावा.
"पशुपालकांना तात्काळ आणि दर्जेदार सेवा देणे ही आमची प्राथमिकता आहे. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी १९६२ हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटचा अधिकाधिक वापर करावा."
— डॉ. किरण पाटील, आयुक्त, पशुसंवर्धन विभाग