नाशिकमधील या तीन हॉस्पिटल्सच्या संस्थापकांवर गुन्हा दाखल... कोट्यवधींचा घोटाळा भोवणार...

Share:
Main Image
Last updated: 02-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २ ऑगस्ट - राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य योजनांचा गैरवापर करून सुमारे १ कोटी ७९ लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी नाशिकमधील तीन नामांकित रुग्णालयांच्या संस्थापकांवर मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (AB-PMJAY) आणि 'महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना' (MJPJAY) अंतर्गत ३६१ बोगस वैद्यकीय दावे सादर करून ही फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव चंद्रकांत विभुते यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

गुन्हा दाखल झालेली रुग्णालये व संस्थापक:

१. शिव मल्टीस्पेशालिटी आणि क्रिटिकेअर हॉस्पिटल: त्रिलोक पाटील आणि राहुल पाटील (१६३ बोगस दाव्यांद्वारे सुमारे ₹७१ लाखांचा घोटाळा).

२. ग्रेस हॉस्पिटल: राहुल पाटील आणि विठ्ठल पाटील (१२६ बोगस दाव्यांद्वारे सुमारे ₹६२ लाखांचा घोटाळा).

३. हृषिकेश हॉस्पिटल: प्रशांत जाधव आणि प्रीतम पाचपुते (७२ बोगस दाव्यांद्वारे सुमारे ₹४५ लाखांचा घोटाळा).

Advertisement

घोटाळा कसा उघडकीस आला?

मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशानुसार राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत सादर केलेल्या संशयास्पद दाव्यांची चौकशी करण्यात आली. जुलै २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पोर्टलवर सादर केलेल्या १५,४०७ दाव्यांची तपासणी केली असता एकाच मोबाईल नंबरवरून ५ लाख रुपयांहून अधिक रकमेचे दावे वारंवार करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान:

लाभार्थी आणि मोबाईल नंबर चुकीचे आढळले.

मृत पावलेल्या व्यक्तींवर उपचार सुरू असल्याचे दाखवून त्यांच्या मृत्यूनंतरही सरकारी निधीचे दावे ठोकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हे दाखल

या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३१६ (विश्वासघात), ३१८ (फसवणूक), ३३६ (बनावट दस्तऐवज तयार करणे), ३३८ आणि ३४० (बनावट दस्तऐवजांचा वापर करणे) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.