मनोहर शिंदे, (नाशिक) १ ऑगस्ट - शहरात सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस, त्यातच ठिकठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते आणि खड्ड्यांमुळे नाशिककरांचे जगणे असह्य झाले आहे. MNGL (महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड) कंपनीच्या बेजबाबदार आणि मनमानी कारभारामुळे आतापर्यंत ४ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून संपूर्ण शहरात नागरिकांचा तीव्र संताप पाहायला मिळत आहे. या संपूर्ण गंभीर परिस्थितीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या आढावा बैठकीलाच MNGL चे अधिकारी गैरहजर राहिल्याने महाजन यांनी फोनवरून अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
कुंभमेळा बैठकीत MNGL ची दांडी!
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळा प्राधिकरणात प्रशासकीय यंत्रणांची महत्त्वाची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला विविध विभागांचे तब्बल २०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मात्र, ज्या MNGL कंपनीमुळे संपूर्ण शहर खड्ड्यात गेले आहे, त्या कंपनीचे जबाबदार अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिले.
महापालिका अन् कुंभमेळा आयुक्तांचा गंभीर दावा
या बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त आणि कुंभमेळा आयुक्त दोघांनीही MNGL कंपनीच्या अनागोंदी कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. "MNGL च्या मनमानी आणि बेपरवा कारभारामुळेच आज नाशिक शहर अत्यंत विपन्नावस्थेत गेले आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने अपघात वाढत असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे," असा गंभीर दावा दोन्ही आयुक्तांनी बैठकीत केला.
गिरीश महाजनांनी फोनवरून सुनावले
MNGL ची मनमानी थेट मंत्र्यांच्या बैठकीपर्यंत पोहोचल्याने मंत्री गिरीश महाजन प्रचंड संतप्त झाले. त्यांनी बैठकीतूनच MNGL च्या गैरहजर अधिकाऱ्यांना थेट दूरध्वनीवरून संपर्कात घेतले आणि कडक शब्दांत सुनावले. तसेच, आगामी सोमवारी प्रशासनासमोर हजर राहण्याचे आणि कामाचा स्पष्टीकरण देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
नाशिककरांमध्ये तीव्र संताप
पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आत्तापर्यंत ४ जणांचा बळी जाऊनही प्रशासन आणि MNGL अधिकारी ढिम्म आहेत. आता थेट मंत्र्यांच्या आदेशालाही जुमानणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, असा सवाल नाशिककर विचारत आहेत.