पोलिसाने मागितले ५० हजार... अखेर इतक्या हजारांवर तडजोड... किराणा दुकानातच पकडले...

Share:
Main Image
Last updated: 01-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ ऑगस्ट - पोक्सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला आरोपी न करण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारताना सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (वर्ग-२) आणि एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी (दि. ३१ जुलै) सुरगाणा येथे करण्यात आली.  

या प्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिवाजी दवंगे (वय ५७, रा. तारा निवास, साई नगर, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड) आणि खाजगी इसम इब्राहिम करीम वाणी (वय २८, रा. जामुनमाथा, ता. सुरगाणा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार (वय ४७, व्यवसाय - शेती) यांच्या मुलाविरुद्ध सुरगाणा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १३७ (२) आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद असून तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक चंद्रकांत दवंगे यांनी १९ जून २०२६ रोजी तक्रारदाराला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. 'तुम्हाला व तुमच्या पत्नीला या गुन्ह्यात आरोपी करतो' अशी धमकी देऊन आरोपी न करण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी त्यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.  

तक्रारदाराने याबाबत २० जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नाशिक येथे तक्रार नोंदवली. त्याच दिवशी करण्यात आलेल्या पंचांसमक्ष पडताळणीदरम्यान दवंगे यांनी ५० हजारांवरून तडजोड करत २० हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.  

Advertisement

किराणा दुकानात लाच स्वीकारताना पकडले

दरम्यान, २१, २४ आणि ३० जून रोजी लाचेची रक्कम देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु दवंगे यांनी रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली अथवा ते उपलब्ध नव्हते. अखेर ३१ जुलै २०२६ रोजी एसीबीने सुरगाणा येथे सापळा रचला. दवंगे यांनी तक्रारदाराला सुरगाणा पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीजवळ असलेल्या 'आदेश किराणा जनरल स्टोअर्स' येथे पाठवले. तेथे दुकानात काम करणारा खाजगी इसम इब्राहिम वाणी याच्यामार्फत २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले.  

कारवाई करणारे पथक:

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे, पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, पोलीस अंमलदार नितीन नेटारे आणि समीर शेख यांच्या पथकाने केली.  

एसीबीचे आवाहन:

कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक (दू. क्र. ०२५३-२५७८२३० / व्हॉट्सॲप: ९५४५०३१०६४) किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.