रस्त्यावर चॉपरने हल्ला... तरुणांचा तुफान राडा... समोर आले हे धक्कादायक कारण...

Share:
Main Image
Last updated: 01-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ ऑगस्ट - खासगी कोचिंग क्लासमध्ये बसण्याच्या क्षुल्लक वादातून तरुण टोळक्याने रस्त्यावर तुफान राडा करत चौघा मित्रांना बेदम मारहाण केल्याची घटना विसेमळा येथील बॉईज टाऊन स्कूल परिसरात घडली. या घटनेदरम्यान एका संशयिताने चॉपर काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर इतरांनी दगड आणि विटा मारून दहशत पसरवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी तत्परतेने दखल घेत चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हितेश पाटील (रा. सिडको), साहिल कर्हेकर, अनिरुद्ध सूर्यवंशी (रा. सेरीन मिडोज, गंगापूर रोड) आणि प्रथमेश उर्फ सोनू वाघ (रा. मंगलवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमकी घटना काय?

फिर्यादी आणि संशयित हे एकाच खासगी क्लासमध्ये शिकतात. मंगळवारी (दि. २८) दुपारच्या सुमारास वर्गात बसण्याच्या जागेवरून सोहम वाजे आणि हितेश पाटील यांच्यात बाचाबाची झाली होती. याच वादाचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी (बुधवारी, दि. २९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी विद्यार्थी आपल्या राज दराडे, प्रज्वल देवरे आणि सोहम वाजे या मित्रांसह बॉईज टाऊन स्कूलजवळील 'मालक चहा' दुकानावर गेला होता.

Advertisement

त्याच वेळी दोन दुचाकींवरून आलेल्या संशयितांनी त्यांना गाठले आणि शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण सुरू केली.

व्हिडीओ व्हायरल अन् पोलिसांची कारवाई

मारहाणीदरम्यान सोनू वाघ याने कमरेला लावलेला धारदार चॉपर काढून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या साथीदारांनी पळणाऱ्या मुलांच्या दिशेने रस्त्यावरील दगड-विटा भिरकावल्या. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या घटनेची गंभीर दखल घेत सरकारवाडा पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.