कुंभमेळ्यात २७ हजार कोटींचे अर्थचक्र... स्थानिकांना असा मिळेल लाभ...

Share:
Main Image
Last updated: 01-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १ ऑगस्ट -  आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर क्षेत्रात सुमारे २७ हजार कोटी रुपयांची अभूतपूर्व आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे. या भव्य आर्थिक संधीचा प्रत्यक्ष लाभ स्थानिक महिला बचत गट, पथविक्रेते (Street Vendors) आणि सूक्ष्म उद्योजकांना मिळावा, यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि देआसरा फाउंडेशन यांनी संयुक्तपणे 'अनेक' (ANEK: Accelerating Nano Enterprises through Kumbh) उपक्रमाचा पुढील टप्पा सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत 'उमेद' (UMED) आणि 'राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' (NULM) मधील लाभार्थ्यांसाठी विशेष क्षमता विकास कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यापूर्वी केलेल्या अभ्यासानुसार, कुंभमेळ्यादरम्यान प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष व्यवहारांतून २७ हजार कोटींची उलाढाल होणार असून, या अर्थचक्रात स्थानिकांचा सहभाग वाढवणे हा 'अनेक' उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

४ आणि ५ ऑगस्टला मार्गदर्शक सत्रे

या अभियानांतर्गत ४ ऑगस्ट रोजी 'उमेद' मधील महिला बचत गटांसाठी, तर ५ ऑगस्ट रोजी 'एनयूएलएम'अंतर्गत येणाऱ्या पथविक्रेत्यांसाठी मार्गदर्शक सत्रे आयोजित केली आहेत. यामध्ये कुंभमेळ्यातील व्यवसायाच्या संधी, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि आर्थिक साक्षरता यावर मार्गदर्शन केले जाईल.

त्यानंतरच्या टप्प्यात डिजिटल मार्केटिंग, व्हॉट्सॲप बिझनेस, आर्थिक व्यवस्थापन, एफएसएसएआय (FSSAI) व उद्यम नोंदणी, ब्रँडिंग, कर्ज उपलब्धता आणि विक्री कौशल्य यांसारख्या व्यावहारिक विषयांवर तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशासकीय प्रमुख काय म्हणाले?

Advertisement

"कुंभमेळ्यातील आर्थिक संधींचा लाभ तळागाळातील स्थानिकांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. महिला बचत गट व पथविक्रेत्यांना सक्षम करून त्यांना दीर्घकालीन व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे."

— शेखर सिंह (आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण)

"सिंहस्थ हा ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठी संधी आहे. 'उमेद'च्या माध्यमातून महिला बचत गटांना आवश्यक कौशल्य आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल."

— ओमकार पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक जिल्हा परिषद)

"स्थानिक उद्योजकांना पूर्वतयारी म्हणून योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते कुंभमेळ्यादरम्यान उपलब्ध संधींचा सर्वाधिक फायदा घेऊ शकतील."

— प्रज्ञा गोडबोले (सीईओ, देआसरा फाउंडेशन)

Advertisement

Comments

No comments yet.