मनोहर शिंदे, (नाशिक) १ ऑगस्ट - शेअर बाजारात नोंदणीकृत (Publicly Listed) असलेली नाशिकची नामांकित कंपनी 'क्युपिड लिमिटेड' (Cupid Limited) या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीने 'जीआयआय हेल्थकेअर इनव्हेस्टमेंट' (GII Healthcare Investment) प्लॅटफॉर्ममध्ये ५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची (सुमारे ४० कोटींहून अधिक रुपये) अतिरिक्त (Follow-on) गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे क्युपिडचा 'जीसीसी' (GCC - गल्फ कॉरपोरेशन कौन्सिल) म्हणजेच आखाती देशातील आरोग्य क्षेत्रातील प्रभाव आणि व्यापार आणखी मजबूत होणार आहे.
क्युपिडने यापूर्वीही या प्लॅटफॉर्ममध्ये प्राथमिक गुंतवणूक केली होती. हे इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म 'जीआयआय' (GII) या प्रसिद्ध जागतिक गुंतवणूक संस्थेकडून चालवले जाते. 'जीआयआय'कडे सध्या ३.५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्ता (Assets Under Management) असून ही संस्था सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), युरोप, अमेरिका आणि भारतात कार्यरत आहे. या प्लॅटफॉर्मची सौदी अरेबियातील अग्रगण्य आरोग्य सेवा पुरवठादार कंपनी 'अबीर मेडिकल कंपनी' (Abeer Medical Company) आणि 'अलमिस्वक डेंटल कंपनी' (AlMeswak Dental) या डेंटल अन् डर्मेटोलॉजी केअर साखळीत मोठी भागभांडवली भागीदारी (Equity Stake) आहे.
१९९३ पासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत:
१९९३ मध्ये स्थापन झालेली 'क्युपिड लिमिटेड' ही नाशिकस्थित कंपनी आरोग्य आणि स्वच्छता (Healthcare and Hygiene) उत्पादनांच्या निर्मितीत अग्रगण्य आहे. कंपनी पुरुष आणि महिलांसाठी गर्भनिरोधके (Contraceptives), वॉटर-बेस्ड पर्सनल केअर जेल्स आणि इन-व्हिट्रो डायग्नोस्टिक (IVD) किट्स तयार करण्यात विशेष प्राविण्य बाळगून आहे. या नव्या गुंतवणुकीमुळे नाशिकच्या या कंपनीचे नाव आंतरराष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात आणखी उंचावले आहे.