मनोहर शिंदे, (नाशिक) ३१ जुलै - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर गर्दी व आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा, संपर्क यंत्रणा आणि पूर्वसूचना प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने शुक्रवारी (३१ जुलै) नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक घेतली. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणात पार पडलेल्या या बैठकीनंतर समितीने शहरातील प्रमुख कुंभस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून नियोजित तांत्रिक सुविधांचा आढावा घेतला.
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य प्रा. दीपांकर चौधरी (आयआयटी मुंबई), महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव रतनसिंह परदेशी आणि प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आधुनिक प्रणालीवर भर
बैठकीत कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने सिंहस्थासाठी सुरू असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती देण्यात आली. यामध्ये:
गर्दी व्यवस्थापनाचा आराखडा
कमांड अँड कंट्रोल सिस्टीम
सीसीटीव्ही नेटवर्क आणि संप्रेषण (Communication) प्रणाली
पूर्वसूचना यंत्रणा (Early Warning System)
यांसारख्या विविध तांत्रिक उपाययोजनांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या प्रणालींची गरज, त्यांची उभारणी आणि विविध शासकीय विभागांमधील समन्वयाबाबत समितीने सखोल चर्चा केली.
प्रत्यक्ष स्थळ पाहणी
बैठकीनंतर समितीने नाशिकमधील प्रमुख कुंभस्थळांना भेट दिली. तेथील भौगोलिक परिस्थिती, भाविकांच्या येण्या-जाण्याचे संभाव्य मार्ग, नियंत्रण व्यवस्था आणि तांत्रिक उपकरणांची प्रस्तावित ठिकाणे यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
या पाहणीच्या आधारे तांत्रिक सल्लागार समिती राज्य शासनाला आपला शिफारस अहवाल सादर करणार असून, त्यानंतरच तांत्रिक यंत्रणांच्या अंमलबजावणीला अंतिम रूप दिले जाईल. दरम्यान, ही समिती शनिवारी (१ ऑगस्ट) त्र्यंबकेश्वर येथील कुंभक्षेत्राची पाहणी करून तेथील तयारीचा आढावा घेणार आहे.