नाशिक, (प्रतिनिधी) ३१ जुलै - मोबाईलमध्ये अनोळखी 'एपीके' (APK) फाईल इन्स्टॉल करण्यास सांगून एका व्यावसायिकाच्या बँक खात्यातून १ लाख ६९ हजार रुपयांची रोकड लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात फसवणुकीसह 'आयटी अॅक्ट'नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काठेगल्ली (द्वारका) येथील रहिवासी प्रविण संतोष पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पवार हे व्यावसायिक असून त्यांची 'केपीएस इन्फ्रास्ट्रक्चर' नावाची फर्म आहे. रविवारी (२६ तारीख) सायंकाळच्या सुमारास पवार हे नाशिक-पुणे मार्गावरील सिद्धार्थ हॉटेलजवळ असलेल्या धात्रक पेट्रोल पंपावर गेले होते.
त्या ठिकाणी जोशी नावाच्या एका इसमाने पवार यांना गाठले. त्यांना विविध बाबींमध्ये बोलण्यात गुंतवून, संशयिताने ७०९१६७५६९५ या मोबाईल क्रमांकावरून पवार यांच्या मोबाईलवर एक 'एपीके फाईल' पाठवली. ती फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास भाग पाडले.
पवार घरी परतल्यानंतर अवघ्या तीन तासांच्या आत, त्यांच्या 'केपीएस इन्फ्रास्ट्रक्चर' या फर्मच्या नावे असलेल्या 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या खात्यातून १ लाख ६९ हजार रुपये परस्पर लांबवण्यात आले. दुसऱ्या दिवशी पवार यांनी बँकेशी संपर्क साधला असता, ही रक्कम 'ॲटम टेक्नॉलॉजी' नावाच्या खात्यात ट्रान्सफर झाल्याचे समोर आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय शिरसाठ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नागरिकांना आवाहन: मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही 'एपीके' फाईल, बँक अपडेट किंवा रिवॉर्ड्सच्या लिंक्सवर क्लिक करू नका. अनोळखी फाईल इन्स्टॉल केल्यास मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे जाऊन बँक खाते रिकामे होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.