एस.के. खेडकर, (नाशिक) ३१ जुलै - नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ साठी घाटांची वहनक्षमता, भाविकांची संख्या, पार्किंग, सार्वजनिक वाहतूक आणि वीज-पाणी सुविधांचा सर्वंकष विचार करून वैज्ञानिक, डेटा-आधारित व खर्च-परिणामकारक 'मोबिलिटी आराखडा' तयार करावा, असे स्पष्ट निर्देश नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले. तसेच सर्व संबंधित विभागांनी आपापसांत समन्वय ठेवून वेळबद्ध कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित सिंहस्थ-२०२७ च्या पार्किंग व मोबिलिटी नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय ऐनपुरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीतील मुख्य निर्णय व महत्त्वाचे मुद्दे:
पार्किंगवर अवाजवी खर्च टाळणार:
पार्किंगसाठी गरजेपेक्षा जास्त जमीन विकसित करून मोठा खर्च करणे टाळावे. प्रत्यक्ष गरज आणि वैज्ञानिक विश्लेषण यावर आधारितच आराखडा असावा. पार्किंग क्षेत्रांमध्ये जमीन समतल करणे, प्रवेश-निर्गमन मार्ग, वीज-पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाशयोजना, सीसीटीव्ही आणि क्लोकरूम अशा मूलभूत सुविधा प्राधान्याने पुरवण्याचे निर्देश देण्यात आले.
आउटर पार्किंग ठरणार 'ट्रान्झिट हब':
बाहेरून येणाऱ्या एसटी आणि खासगी बसेस आउटर पार्किंगपर्यंतच येतील. तेथून पुढे त्र्यंबकेश्वर व इतर ठिकाणी जाण्यासाठी बससेवा उपलब्ध असेल. तसेच आउटर ते इनर पार्किंगदरम्यान नियंत्रित स्वरूपात कॅब, ऑटोरिक्षा, ई-रिक्षा सेवा पुरवण्यासाठी डिजिटल नोंदणी व स्वतंत्र मार्ग विकसित केले जातील. घाट परिसरात कोणत्याही खासगी वाहनाला प्रवेश अथवा पार्किंगला परवानगी दिली जाणार नाही.
'ड्रॉप-अँड-रिटर्न' प्रणाली:
हॉटेल्स व ट्रॅव्हल ऑपरेटर्सच्या मोठ्या बसेससाठी 'ड्रॉप-अँड-रिटर्न' प्रणाली लागू केली जाईल. या बसेस इनर पार्किंगमध्ये न थांबता प्रवाशांना उतरवून पूर्वनियोजित ठिकाणी परत जातील.
बाह्य केंद्रांत वाहन होल्डिंग एरिया:
घाटांची वहनक्षमता ओळखूनच शहरात वाहनांना प्रवेश दिला जाईल. गर्दी नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार संगमनेर, सिन्नर, धुळे, मालेगाव यांसारख्या बाह्य केंद्रांमध्ये वाहने रोखून टप्प्याटप्प्याने शहरात सोडण्याचे नियोजन कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी मांडले.
सूर्यग्रहणासाठी विशेष नियोजन:
२ ऑगस्ट २०२७ रोजी होणारे सूर्यग्रहण आणि त्या दिवशी होणारे विशेष धार्मिक स्नान लक्षात घेता, विशिष्ट वेळेत वाढणाऱ्या गर्दीचा विचार करून स्वतंत्र वाहतूक व सुरक्षा आराखडा तयार करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.