नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ३१ जुलै - चालू वर्षाच्या नैऋत्य मान्सून हंगामात 'एल निनो' परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ दरम्यान एल निनो अधिक तीव्र होऊन तो 'अत्यंत तीव्र' श्रेणीत पोहोचू शकतो, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय भू-विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही माहिती सादर केली.
'सुपर एल निनो' अशी अधिकृत व्याख्या नाही
जागतिक हवामान संघटना (WMO) किंवा भारतीय हवामान विभागाद्वारे (IMD) "सुपर एल निनो" अशी कोणतीही अधिकृतपणे व्याख्या किंवा श्रेणी नाही, असे भू-विज्ञान मंत्र्यांनी स्पष्ट केले. तांत्रिकदृष्ट्या प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातील तीव्रतेनुसार एल निनोचे वर्गीकरण सौम्य, मध्यम, तीव्र आणि अत्यंत तीव्र असे केले जाते. जून २०२६ मध्ये एल निनोची परिस्थिती सौम्य होती, जी जुलैमध्ये मध्यम स्तरापर्यंत वाढली आहे.
मान्सूनवर परिणामाचे गणित संमिश्र
ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान एल निनोची तीव्रता वाढणार असली, तरी भारतीय मान्सूनवर त्याचा नेमका काय परिणाम होईल, हे केवळ एल निनोवर अवलंबून नसून महासागर आणि वातावरणातील इतर अनेक घटकांच्या एकत्रित परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे हवामान विभाग सतत या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
हवामान विभाग आणि प्रशासनाची तयारी:
नियमित अंदाज: हवामान विभाग केंद्र व राज्य सरकारांना नियमित हंगामी, मासिक आणि विस्तारित-कालावधीचे अंदाज जारी करत आहे.
७ दिवसांचा दैनिक इशारा: आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे, राज्य सरकारे आणि जिल्हा प्रशासनाला पूर्वतयारीसाठी मदत व्हावी म्हणून पुढील ७ दिवसांसाठी जोखमीवर आधारित दैनिक इशारे दिले जात आहेत.
शेतकरी व नागरिकांना सूचना: विविध संप्रेषण माध्यमांद्वारे परिणामांवर आधारित अंदाज वेळेवर पोहोचवले जात आहेत.