नाशिक, (प्रतिनिधी) ३० जुलै - शहर आणि परिसरात चोरी अन् जबरी चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. रस्ता ओलांडणाऱ्या महिलेची सोनसाखळी हिसकावणे, विमान प्रवासात बॅगेतील दागिने लांबवणे, बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंग करणे आणि चक्क दुकानात लहान मुलीच्या हातातील सोन्याचे दागिने चोरणे अशा चार वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमध्ये भामट्यांनी लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला असून शहरात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
१. बिटको चौकात महिलेची सोनसाखळी हिसकावली
उपनगर परिसरातील इच्छामणी गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या प्रभा पवन त्रिपाठी (वय ४५) या नाशिकरोड येथून पायी घराकडे जात असताना पवन हॉटेल जवळील अनमोल पुस्तकालयासमोर रस्ता ओलांडत होत्या. यावेळी पाठीमागून दुचाकीवर 'ट्रिपल सीट' आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी ओरबाडून पोबारा केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार आडणे तपास करत आहेत.
२. पोलंड ते मुंबई विमान प्रवासात सव्वा लाखाचे दागिने गायब
पाथर्डी फाटा परिसरातील मोक्ष फाऊंडेशनजवळ राहणाऱ्या तृप्ती विशालदीप देसाई या पोलंड येथून दिल्लीमार्गे मुंबई असा विमानप्रवास करून भारतात परतल्या. घरी पोहोचल्यानंतर कपड्यांची बॅग तपासली असता, त्यात ठेवलेले सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे अलंकार आणि महत्त्वाचे कागदपत्रे गायब असल्याचे निदर्शनास आले. प्रवासादरम्यान चोरट्यांनी हा डल्ला मारल्याची शक्यता असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हवालदार देवरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
३. महामार्ग बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चेन लांबवली
म्हसरूळ, दिंडोरी रोड येथील रहिवासी धनंजय मारुतीराव शिरोळे हे त्यांच्या पत्नी धनश्री यांना कसारा बसमध्ये बसवून देण्यासाठी महामार्ग बसस्थानकातील फलाट क्रमांक १ वर आले होते. बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शिरोळे यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट आणि साखळी हातोहात लांबवली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार गायकवाड तपास करत आहेत.
४. कपड्यांच्या दुकानात लहान मुलीच्या हातातील मनगटी पळवली
रविवार पेठेतील शनी गल्लीत राहणारे जगदीश परदेशी हे लहान मुलगी अनिष्का हिच्यासह रविवार कारंजा येथील जरीवाला कपड्यांच्या दुकानात खरेदीसाठी गेले होते. दुकानात कपडे बघण्यात व्यस्त असताना एका अज्ञात भामट्या महिलेने काऊंटरजवळ खेळणाऱ्या लहानग्या अनिष्काच्या हातातील ८० हजार रुपये किमतीचे ६ सोन्याचे मनी आणि सटवाई असलेली मनगटी शिताफीने काढून घेतली आणि पोबारा केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार बागुल पुढील तपास करत आहेत.