बँकेने सील केलेल्या फ्लॅटचा बेकायदा ताबा घेतला... नाशिकच्या कामटवाड्यात तिघांवर गुन्हा...

Share:
Main Image
Last updated: 30-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० जुलै - कर्जबुडवेपणामुळे बँकेने रीतसर कारवाई करत जप्त केलेल्या फ्लॅटचे सील तोडून एका कुटुंबाने बेकायदा ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामटवाडा शिवारातील आनंदनगर परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी तीन जणांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंदा पोळे, मंगला पोळे आणि अजय पोळे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी समीश सहदेवन (रा. पालघर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने झाली होती कारवाई

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदनगर येथील मयुर हॉस्पिटलजवळील ‘सप्तशृंगी ॲनेक्स’ या इमारतीतील फ्लॅट नंबर ३ ही सदनिका मूळ मालकाने कर्जाची परतफेड न केल्याने फायनान्स कंपनीने जप्त केली होती. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कायदेशीर आदेशान्वये ही जप्तीची कारवाई करून सदनिकेला कंपनीकडून रीतसर सील ठोकण्यात आले होते.

सील तोडून घरात प्रवेश

असे असतानाही, गेल्या मंगळवारी (दि. २८) सायंकाळच्या सुमारास संशयित पोळे कुटुंबाने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता आणि कायद्याची तमा न बाळगता सील केलेल्या फ्लॅटमध्ये बेकायदा प्रवेश करून ताबा मिळवला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कंपनी प्रतिनिधीने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाडवी करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.