मृत व्यक्तीचा खोटा अंगठा अन् रेशन कार्डवर खाडाखोड! नोकरीसाठी भयंकर 'गेम'..

Share:
Main Image
Last updated: 30-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० जुलै - बनावट कागदपत्रांच्या आधारे आपण ‘प्रकल्पग्रस्त’ असल्याचे भासवून एकलहरा येथील औष्णिक विद्युत केंद्रात शासकीय नोकरी लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कागदपत्रांच्या पडताळणी दरम्यान महसूल विभागाच्या हा प्रकार निदर्शनास आला असून, याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश कैलास पाळदे (रा. एकलहरा, ता. जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी मंडळ अधिकारी रामसिंग मगनसिंग परदेशी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वडिलोपार्जित जमीन नसताना मिळवला दाखला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आकाश पाळदे याने १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पुनर्वसन उपजिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी अर्ज केला होता. औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पासाठी कोणतीही वडिलोपार्जित जमीन संपादित झालेली नसतानाही त्याने २१ डिसेंबर २०२१ रोजी प्रकल्पग्रस्त दाखला मिळवला. या दाखल्याच्या आधारे त्याने औष्णिक विद्युत केंद्रात ‘प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी’ म्हणून शासकीय नोकरी मिळवली.

Advertisement

मृत व्यक्तीचा खोटा अंगठा अन् रेशन कार्डवर खाडाखोड!

कागदपत्रांची पडताळणी झाली असता संशयिताचा हा भांडाफोड झाला. संशयिताने अर्जात ओढा (ता. जि. नाशिक) येथील शेत गट क्र. २९३ मधील ०.२३ आर जमीन औष्णिक केंद्रासाठी संपादित झाल्याचे दाखवले होते. ही जमीन विठोबा खंडू पाळदे यांच्या मालकीची होती.

विशेष म्हणजे, मूळ मालक विठोबा पाळदे हे मयत झालेले असतानाही संशयिताने २८ जुलै आणि ८ डिसेंबर २०२१ रोजी दोन वेगवेगळ्या नोटरी केल्या. मृत व्यक्तीचे खोटे अंगठे आणि फोटो लावून खोटी वंशावळ तसेच संमतीपत्र तयार करून पुनर्वसन कार्यालयाला सादर केले. एवढेच नव्हे तर, तहसीलदार नाशिक यांच्याकडून घेतलेल्या रेशन कार्डवर (क्र. २४४४०१) 'कैलास विष्णू' ऐवजी 'कैलास विठोबा पाळदे' असे हाताने लिहून खाडाखोड केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डगळे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.